बीड : पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडातील ५ आरोपींना जन्मठेप, इतरांची निर्दोष मुक्तता | पुढारी

बीड : पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडातील ५ आरोपींना जन्मठेप, इतरांची निर्दोष मुक्तता

केज (जि.बीड), पुढारी वृत्‍तसेवा : केज तालुक्यातील मांगवडगाव येथे मे २०२० रोजी जमिनीच्या वादातून पारधी समाजावर केलेल्या हल्ल्यात पारधी समाजातील तिघांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. त्या महाराष्ट्रातील  पारधी समाजातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून इतरांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

केज तालुक्यातील मांगवडगाव येथे पारधी समाजातील पवार आणि सवर्ण समाजातील निंबाळकर यांच्या अनेक वर्षापासून जमिनीचा वाद सुरू होता. अनेक वेळा यांच्यात मारामाऱ्या देखील झाल्या होत्या आणि हातपाय देखील फ्रॅक्चर झाले होते. दरम्यान २००६ मध्ये न्यायालयाने वादग्रस्त जमिनीचा निकाल हा पवार यांच्या बाजूने दिला होता.

पवार कुटुंब हे जमिनीचा ताबा घेण्यासाठी १३ मे ला आपला सर्व पसरा व सामान ट्रॅक्टरमध्ये घेऊन मांगवडगाव येथे शेतात गेले. त्‍यानंतर  निंबाळकर कुटुंब हे प्रचंड अस्वस्थ झाले. आता याचा सोक्ष-मोक्ष लावायचा आणि हे सर्व कुटुंब संपवायचे असा निश्चय केला. घरात असलेल्या तलवारी, कुऱ्हाडी आणि लोखंडी गज काढून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ते शेतात गेले.

दरम्यान, पवार कुटुंब शेतात बसले होते. अचानक निंबाळकर कुटुंबीयांनी त्यांच्यावर हातातील शस्त्रनिशी हल्ला केला होता. या हल्ल्यात पारधी कुटुंबातील बाबू शंकर पवार, त्याची दोन मुले प्रकाश बाबू पवार आणि संजय बाबू पवार यांचा जागीच मृत्यू झाला होता तर दादूली प्रकाश पवार ही जखमी झाली होती.

तसेच, या प्रकरणी धनराज बाबू पवार यांच्या फिर्यादी वरून तेरा आरोपी विरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. १०६/२०२० भा.दं. वि. १४३,१४७, १४८, १४४, ३०२, ३०७, १२०(ब), ४३५, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या तिहेरी हत्याकांड प्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात चालु असलेल्या मांगवडगाव येथील खुन प्रकरणी प्रकरणी महाराष्ट्र शासन वि. निंबाळकर व इतर १३ आरोपी प्रकरणात दुसरे सत्र न्यायाधीश मा. व्ही. के. मांडे यांनी सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत उर्फ पिंटु मोहन निंबाळकर, बालासाहेब बाबुराव निंबाळकर,  राजाभाउ हरिश्चंद्र निंबाळकर आणि जयराम तुकाराम निंबाळकर या पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

सरकार पक्षातर्फे एकुण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात जखमी साक्षीदार, डॉक्टर, पोलीस अधिकारी वगैरे साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. उपलब्ध साक्ष पुरावे ग्राहय धरुन तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन मा. दुसरे सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी पाच आरोपीना शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस आणि त्यांचे लेखनिक संजय राठोड यांनी तपास केला तर सरकार पक्षातर्फे  ॲड. ए. व्ही. कुलकर्णी यांनी काम पाहीले. त्यांना ॲड आर. एम. ढेले, ॲड. नितीन पुजदेकर यांनी सहाय्य केले. पोलीस पैरवी गोविंद कदम, पोलीस नाईक बाबुराव सोडगीर यांनी केली.

पार्श्वभूमी

सुमारे वीस वर्षांपूर्वी केज तालुक्यातील मांगवडगाव येथील मोहन निंबाळकर हे बेपत्ता झाले होते. परंतु त्यांचा अद्याप पर्यंत मृतदेह मिळाला नाही किंवा तपास लागला नाही. मात्र या मागे पवार यांचाच हात असावा आणि त्यांनीच मोहन निंबाळकर यांचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावली असावी किंवा त्यांचा घातपात केला असल्याचा संशय होता. कारण यांचात अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू होता. त्या प्रकरणी पवार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच अनेक वेळा यांच्यात मारामाऱ्या देखील झाल्या होत्या आणि हातपाय देखील फ्रॅक्चर केले होते. या प्रकरणात पवार यांची निर्दोष मुक्तता झाली होती परंतु जमिनीच्या वादापोटी त्यांचे वैर कायम होते.

हे ही वाचलं का  

Back to top button