

शिरगाव : पुढारी वृत्तसेवा : सोमाटणे फाटा येथे होत असलेल्या अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज कुणाला ना कुणाला रुग्णालयाची हवा खावी लागत आहे. काहींना तर आपल्या जिवाला मुकावे लागत आहे.
त्यामुळे सोमाटणे येथील चौक हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या चौकात असलेले सिग्नल 'असून अडचण नसून खोळंबा' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
या मार्गावर पुढे द्रुतगती मार्ग असल्याने मुंबईकडे जाणार्या वाहनांची सारखी रेलचेल असते. त्याशिवाय या वाहनांचा वेगही जास्त असल्याने नियंत्रण गमावण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे या चौकात सिग्नलची नितांत गरज आहे.
सोमाटणे फाटा हा परंदवाडी, धामणे, बेबेडहोळ, शिरगाव, दारूंब्रे, साळुंब्रे, गहुंजे, सांगवडे, गोडूब्रे आदी गावांना जोडणारा एकमेव दुवा असल्याने या चौकात नेहमी वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ असते.
त्याशिवाय या भागात लोकवस्ती वाढण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर असल्याने रोज या फाट्यावर छोटा मोठा एक तरी अपघात ठरलेला असतो. जर या वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी कायम वाहतूक पोलीस कर्मचारी असेल तर वाहन चालकावर वचक राहील.
त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल. तळेगावहून सोमाटणे फाट्याकडे येताना तीव्र उतार आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारी वाहने नेहमी वेगाने येत असतात. काही वेळा ब्रेक न लागून चालकाचा गाडीवरील ताबा सुटतो आणि अपघात होतो.
नुकतेच एका अपघातात सोमाटणे येथील वीज कर्मचारी बोरसे यांना अपघात होऊन आपला जीव गमवावा लागला आहे. त्याशिवाय पाच-सहा दिवसांपूर्वी एक तरुणी उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून मृत्युमुखी पडली होती.
त्याशिवाय या मार्गावर बर्याच जणांना अपघात होवून दवाखान्यात जावे लागले आहे. काही जणांना कायमचे अपंगत्व पत्करावे लागले आहे. सोमाटणे येथून शिरगावच्या दिशेने वळताना वेग कमी करावा लागतो.
परंतु, खिंडीतील तीव्र उतारामुळे मागील वाहन चालकास वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने समोरील वाहनावर जावून धडकल्याने अनेकदा अपघात झाले आहेत.
जर या मार्गावर तळेगाव खिंड ते सोमाटणे या दरम्यान, काही गतीरोधक बसवले तरी वेगावर मर्यादा येऊ शकतात असेही काही वाहतुक तज्ज्ञांनी सांगितले आहे.उसाचे भरलेले ट्रक, डंपर आदींमुळे लहान वाहनचालकास जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागत आहे.
मुंबई पुणेहून येणारे काही तरुण धूम स्टइलने स्टंट करून मोटारसायकल पळवत असतात त्यामुळेही अपघाताला निमंत्रण मिळते. शिरगाव ते संत तुकाराम साखर कारखाना या रस्त्यावर कारखाना सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणावर वाणांची वर्दळ असते.
त्यासोबतच सिग्नल यंत्रणेमध्ये सतत बिघाड होत असल्याने वाहन चालकास थांबायचे की जायचे कळत नाही. सोमाटणे फाट्यावर लोकवस्ती सातत्याने वाढत चालली असून हा चौक नागरिकांनी सतत गच्च दिसून येतो आहे.
अनेक छोटी-मोठी वाहने या रस्त्यावरून धावत आहेत. तळेगाव एमआयडीसी व हिंजवडी एमआयडीसी यांना जोडणार्या मुख्य रस्त्यावर सोमाटणे फाटा असून शिरगाव मार्गे हिंजवडीकडे जाणारी वाहने देखील याच चौकातून येत जात आहेत.
सतत गजबजलेल्या या चौकात वाढती रहदारी लक्षात घेऊन कायमस्वरूपी उड्डाण पूल बांधण्यात यावा व पोलीस प्रशासनाने कायम पोलीस कर्मचारी या वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी नियुक्त करावा, अशी मागणी सोमाटणे परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे.
आम्ही वरिष्ठांशी लेन वाढविण्याबाबत मागणी केली आहे. लेन वाढवणे हे काम प्रस्तावित आहे. पुढील आदेश मिळताच आम्ही लेन वाढवू.
– उत्तम चौगुले, कर्मचारी, आयआरबी
या चौकातील सिग्नल यंत्रणा अद्ययावत व्हावी, अशी मागणी करणार आहोत. अपघाताची रोजची संख्या पाहता या चौकात कायम वाहतूक पोलिस कर्मचारी नेमावा. जेणेकरून अपघातावर नियंत्रण येईल व नागरिकांचे प्राण वाचतील.
– विशाल मुर्हे, उपसरपंच, ग्रामपंचायत सोमटणे
सध्या या चौकात प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक आहे. आयआरबी कंपनीने लेन वाढवल्या तर अपघाताचे प्रमाण कमी होईल. त्यासाठी आम्ही आयआरबीच्या प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. सध्या कर्मचारी कमी असल्याने दुपारी या चौकात कर्मचारी नसतात. परंतु पूर्णवेळ कर्मचारी आम्ही देणार आहोत, असे पोलिस अधिकार्याने सांगितले.