पुढारी ऑनलाईन डेस्क : "निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा पोलीस दलात रुजू करण्यात बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीदेखील थेट सूचना होती", असा गौप्यस्फोट मोजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ईडीसमोर (ED) केला आहे.
अनिल देशंमुख मनी लाॅंड्रिंग प्रकरणी ईडीने परमवीर सिंग यांचा जबाब नोंदविला आहे. ईडीकडून सचिन वाझे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, "जून २०२० मध्ये सचिन वाझेला पोलीस दलात पुन्हा रुजू करण्यात आले होते. निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस दलात रुजू करून घेण्याच्या निर्णयासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि काही अधिकारी होते. तसेच संबंधित समितीचे सदस्यदेखील उपस्थित होती", अशी माहिती परमवीर सिंह यांनी ईडीला (ED) दिली.
परमवीर सिंह यांनी पुढे सांगितले की, "सचिन वाझे यांची पोलीस दलात पुनर्नियुक्ती केल्यानंतर त्यांना गुन्हे शाखेत पोस्टिंग देण्याबाबतची सुचना करण्यात आली होती. त्याशिवाय काही महत्त्वाची जबाबदारी देण्यास सांगितले होते. त्याशिवाय सचिन वाझेंना CIU ची जबाबदारी देण्यात आली होती. काही महत्त्वपूर्ण प्रकरणांचा तपास CIU कडून करण्यात येत होता. हा तपास वाझेंकडे देण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सांगितले होते", अशीही धक्कादायक माहिती परमवीर सिंह यांनी दिली आहे.
"मुंबई पोलीस दलात बदल्यांसाठी असलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त असतात. या समितीमध्ये पीएसआय ते डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो. मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार करण्यात आली होती. ही यादी मला स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेकदा दिली होती. त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे किंवा त्यांचे ओएसडी रवी व्हटकर यांनीही अनेकदा दिली होती. बदल्यांची ही यादी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून दिली जात होती", अशीही माहिती ईडीला सांगितली आहे.
हे वाचलंत का?