वायरवूमन रूपी दुर्गांमुळे अखंड झगमगाट; जिल्ह्यात २५० ‘वायरवूमन’ कार्यरत

कोल्हापूर : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणार्‍या ‘वायरवूमन’. (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणार्‍या ‘वायरवूमन’. (छाया : पप्पू अत्तार)

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : एकविसाव्या शतकातील स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने जबाबदारी पार पाडत आहेत. पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या विद्युत क्षेत्रात आता महिलांनी आपले पाय घट्ट रोवले आहेत. वायरमन ही संकल्पना बदलत आता समाजात  वायरवूमन ही कार्यरत आहेत, हे दाखवून देण्याचे काम सध्या महावितरण कंपनीत केले जात आहे.

वीज मंडळाच्या स्थापनेपासूनच वायरमन ही संज्ञा रूढ झाली. त्यामुळे विद्युत क्षेत्रात काम करणे केवळ पुरुषांची मक्तेदारी बनली. विद्युत क्षेत्रात खर्‍या अर्थाने विद्युतखांबावर चढणे, छोट्या-मोठ्या ट्रान्स्फॉर्मरवर दुरुस्तीचे काम करणे, विद्युतखांब वाहून नेणे, अशा पुरुषी कामांमुळे या क्षेत्रावर पुरुषांचा पगडा होता. त्यामुळे अगदी आयटीआयमध्ये विद्युत क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी वायरमन अशीच संज्ञा प्रचलित राहिली. मात्र, गेल्या काही वर्षांत याला फाटा देत विद्युत क्षेत्रात महिलांनी आपले स्थान निर्माण केले आहे. आयटीआयमध्ये 'वायरवूमन' अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात कार्यरत झाल्या आहेत.

आता पुरुषांप्रमाणे महिलांनाही महावितरण कंपनीने संधी दिली आहे. प्रत्येक शाखा कार्यालयात किमान दोन महिला कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात या महिलांना जुजबी कामे देण्यात आली. मात्र, सरावाने या महिला आता बहुतांश कामे करू लागल्या आहेत. अगदी विद्युतखांबावर चढून दुरुस्तीचे काम करण्याची जबाबदारीही त्या पार पाडत आहेत. तसेच ट्रान्स्फॉर्मरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी महिला सरसावत आहेत. जिल्ह्यात सुमारे 250 हून अधिक महिला 'वायरवूमन' म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच आलेल्या महापुरात उद्ध्वस्त झालेली विद्युत यंत्रणा दुरुस्तीच्या कामात या रणरागिणींनीही मोलाचे योगदान दिले आहे. पूर, वादळ-वारा यांचा सामना करीत पुरुषांच्या बरोबरीने शहरासह सर्वत्र झगमगाट कायम ठेवण्याचे काम या 'वायरवूमन'रूपी दुर्गांनी केले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news