पेट्रोलचे दर पाण्याच्या बाटलीपेक्षा कमी; पेट्रोलियम राज्यमंत्र्यांचे तर्कट | पुढारी

पेट्रोलचे दर पाण्याच्या बाटलीपेक्षा कमी; पेट्रोलियम राज्यमंत्र्यांचे तर्कट

मुंबई, पुढारी ऑनलाईन

देशात मिनरल वॉटरपेक्षा पेट्रोलचे दर कमी आहेत. राज्य सरकारने लावलेल्या करांमुळेच पेट्रोलचे दर इतके वाढले आहे, असे तर्कट पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी मांडले. या अजब दाव्यामुळे तेली यांना साेशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

देशात सध्या महागाईचा भडका उडाला असून, पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या पेट्रोलचे दर १११ तर डिझेल १०० रुपयांवर विकले जात आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून केंद्र सरकार यातून काहीतरी मार्ग काढेल, असे वाटत असताना केंद्रीय मंत्रीच असे युक्तिवाद करू लागल्याने संताप व्यक्त होत आहे.

केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी एका कार्यक्रमात बोलताना पेट्रोल, डिझेल दरवाढीवर भाष्य केले. त्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर मिनरल वॉटरच्या बाटलीशी केली. ते म्हणाले, ‘मिनरल वॉटरची किंमत पेट्रोल, डिझेलपेक्षा जास्त आहे. पेट्रोलची किंमत ४० रुपये आहे. मात्र, राज्य सरकार भरमसाठ कर लावते. पेट्रोलियम मंत्रायल केवळ ३० रुपये आकारते. मात्र राज्य सरकारच्या करामुळे हा दर १०० रुपयांवर पोहोचतो. तुम्ही हिमालयातील पाणी पिता तेव्हा त्याच्या एका बाटलीची किंमत १०० रुपये आहे.

मोदींचे मंत्री सांगताहेत वेगवेगळी कारणे

इंधन दरवाढीवरून भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी अनेकदा अजब तर्कट मांडले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काँग्रेसवर इंधन दरवाढीचे खापर फोडले. तर पेट्रोलियम  राज्यमंत्री तेली यांनी यांनी मोफत लस दिल्यामुळे पेट्रोलचे दर वाढले आहेत, असा अजब दावा केला. बिहारचे पर्यटनमंत्री आणि भाजपचे नेते नारायण प्रसाद यांनी जनतेला महागाईची सवय झाली आहे, असे संतापजनक वक्तव्य केले. सोमवारी देशात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३० पैसे तर डिझेलच्या दरात ३५ पैसे वाढ करण्यात आली. सध्या देशात इंधनाचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. पेट्रोलच्या दराने देशभरात शंभरी ओलांडली होती.

लस फुकट तर इंधन महागच….

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले असताना तेली यांनी आणखी एक दावा करून वाद ओढवून घेतला आहे. देशभरात कोरोना लस मोफत दिल्याने इंधनाचे दर वाढवले आहेत, असे ते म्हणाले. मागील सलग सात दिवस दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे देशात इंधन दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. असे असताना पेट्रोल स्वस्त असून, जनतेला फुकट लस दिल्यानेच महाग झाले, असा अजब दावा तेली यांनी केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button