Accident : चारचाकीच्या धडकेत तरूण जागीच ठार, एक जण गंभीर - पुढारी

Accident : चारचाकीच्या धडकेत तरूण जागीच ठार, एक जण गंभीर

गारगोटी, पुढारी वृत्तसेवा : गारगोटी शेळोली मार्गावर वाकड नजीक भरधाव चारचाकी गाडीने मोटरसायकलला जोराची धडक (Accident) दिल्याने या धडकेत तळकरवाडी येथील युवक जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याने तातडीने त्यास कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अभिजित शिवाजी तळकर (वय-२०) असे मृताचे तर सतीश सुनील राणे (वय-२० रा. न्हाव्याचीवाडी) असे जखमीचे नाव आहे. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे. दरम्यान अपघात होऊन आठ तास झाले तरी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलिसांशी हुज्जत घालत चालकास अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

आज सकाळी दहाच्या सुमारास अभिजित आणि सतीश मोटरसायकल वरून गारगोटीकडे चालले होते. या दरम्यान गारगोटीकडून धावणाऱ्या ह्युंदाई (एम. एच. ०९ ईके ६४४५) चारचाकीने शेळोली मार्गावरील वाकड नावाच्या शेताजवळ धडक दिल्याने मोटरसायकल अभिजित जागीच ठार झाला, तर सुनील यास डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मृत अभिजीत बारावी पास असून संगणकाचे शिक्षण घेत होता त्याच्या पश्चात आई, वडील व तीन विवाहित बहिणी आहेत. अभिजीतच्या मृत्यूची बातमी गावात समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती आईवडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

अपघात (Accident) सुमारे दहा वाजताच्या सुमारास घडला असताना सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत या अपघाताची पोलिसांत नोंद झालेली नव्हती, त्यामुळे संतापलेल्या मृत अभिजीतचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलिसांसमोर जोरदार हुज्जत घालून संताप व्यक्त करत संबंधित चालकास त्वरित अटक करावी या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकानी नकार दिला.

Back to top button