कोल्हापूर : लालपरी डाऊन वडाप सुसाट! | पुढारी

कोल्हापूर : लालपरी डाऊन वडाप सुसाट!

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कर्मचारी संपामुळे गेले पावणेदोन महिने एस.टी.ची सेवा ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना वडापचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे ‘लालपरी ब्रेकडाऊन, वडाप सुसाट’ अशी जिल्ह्यातील परिस्थिती आहे. या वडापचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांना आता एस.टी. सुरू करा, अशी मागणी करावी लागत आहे.

गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत, त्याचा परिणाम एस.टी.च्या प्रवासी वाहतुकीवर, पर्यायाने उत्पादनावर झाला. आता कोरोना कमी झाल्यानंतर कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे गेले पावणेदोन महिने एस.टी.ची सेवा बंद आहे.

‘वाट पाहीन; पण एस.टी.नेेच जाईन,’ असे म्हणणारा प्रवासी संपामुळे त्रासला आहे. संपाची सर्वात जास्त झळ ग्रामीण भागाला बसत आहे. कारण, ग्रामीण भागात आजही दळणवळणासाठी एस.टी. हाच मुख्य आधार आहे. संपामुळे हा आधारच तुटल्याने लोक वैतागले आहेत.

गेल्या पाच वर्षांत एस.टी.च्या सेवेपेक्षा एस.टी. बंदमुळे गैरसोयीच वाढू लागल्या आहेत. यामुळे प्रवासी वैतागले आहेत. ज्या वडापची सेवा बरोबर नाही म्हणून नागरिक वडापमध्ये बसण्यास नाकारत होते, त्याच वडापचा प्रवास चांगला, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अक्षरश: अंगाची हाडे खिळखिळी होतील, अशा पद्धतीने दाटीवाटीने वडापमध्ये बसून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

वडाप वाहनांवरील धूळ झटकली

खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या 425 टॅक्सी आहेत. याशिवाय खासगी बसेस या 150 पेक्षा अधिक आहेत. एस.टी. प्रवासी वाहतूक सुरू होती, त्यावेळी काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या आपापल्या मार्गावर एक ते दोन फेर्‍या व्हायच्या. कमी फेर्‍यांमुळे वडापचा व्यवसाय आतबट्ट्यात येत होता.त्यामुळे अनेकांनी वडापची वाहने बंद करून अन्य व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले होते; पण एस.टी. बंद झाल्यामुळे वर्षानुवर्षे पार्किंगमध्ये धूळ खात पडलेली प्रवासी वाहतूक करणारी वाहने आता रस्त्यावर धावू लागली आहेत.

खासगी जुन्या बसेस रस्त्यावर

सध्या कोल्हापूर शहरातून अन्य शहरांत जाण्यासाठी सुमारे 300 खासगी बसेस आहेत; पण प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन जुनी वाहने रस्त्यावर आणली जात आहेत. आरटीओकडून जागेवर तपासणी करून त्या वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली जात आहे. जुन्या पार्किंगला लावलेल्या बसेस आता लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत; पण अशी वाहने किती सुरक्षित? याचाही विचार होणे आवश्यक आहे.

Back to top button