कोल्हापूर : दिग्‍दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन | पुढारी

कोल्हापूर : दिग्‍दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत दत्तात्रय जोशी (वय ७७ रा. द्रविड बोळ, महाद्‍वार रोड) यांचे सोमवारी एका खासगी रुग्णायलात निधन झाले. सूत्रधार या हिंदी व टक्कर या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. मराठी चित्रपट अभिनेता हृषिकेश जोशी यांचे ते वडील होत.

कोल्‍हापूरात अंतरराष्‍ट्रीय फिल्‍म फेस्‍टीस्‍टीव्‍हल सुरु करण्‍यात चंद्रकांत जोशी यांचा मोलाचा वाटा होता. दोनच दिवसांपूर्वी बाबुराव पेंटर फिल्‍म सोसायटीच्‍यावतीने त्‍यांनी शाहू स्‍मारक येथे चित्रपट महोत्‍सव भरवला होता. रविवारी त्‍यांची तब्‍येत अचानक बिघडल्‍याने त्‍यांना खाजगी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. त्‍याच्‍यावर उपचार सुरु असतानाच सोमवारी सायंकाळी त्‍याची प्राणज्‍योत मालवली.

चंद्रकांत जोशी यांनी कला शिक्षक म्हणून ३५ वर्ष सेवा केली. शिवाजी विद्यापीठ संगीत नाट्यशास्त्र विभागाचे समन्‍वयक म्हणून काम केले. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सूरू करण्याची संकल्पना त्यांची होती. कोल्‍हापूरच्‍या चित्रपटसृष्‍टीचा चालता बोलता इतिहास व जगभरातील समांतर, कलात्‍मक आणि वेगळा विचार मांडणार्‍या चित्रपटांना महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून रसिकांपर्यंत पोहचवणारा अवलिया हरपला अशा शब्‍दात मान्‍यवरांनी श्रध्‍दांजली वाहीली. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता त्‍यांच्‍या निवासस्‍थापासून अंतयात्रा काढण्‍यात येणार आहे. पंचगंगा स्‍मशानभूमी येथे त्‍यांच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येणार आहेत. त्‍यांच्‍या पश्चात तीन मुले, एक मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सूत्रधार हा हिंदी चित्रपट १९८७ मध्ये प्रदर्शित झाला. यात स्मिता पाटील, गिरीश कर्नाड आणि नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली. चंद्रकांत जोशी यांनी दिग्दर्शित केलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट स्मिता पाटील यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आला होता, कारण, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते.

Back to top button