कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल | पुढारी

कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ( kolhapur district bank election ) जिल्ह्यातील नेतेमंडळी शिवसेनेला सन्मानजनक जागा देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने समविचारी पक्षांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनेल तयार करण्याचा निर्णय शिवसेनेच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. शासकीय विश्रामधाम येथे ही बैठक झाली.

पॅनेलची घोषणा सोमवारी (दि.20) दुपारपर्यंत करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे व मुरलीधर जाधव यांनी दिली. यामुळे जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीला ( kolhapur district bank election ) ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ( kolhapur district bank election ) जिल्ह्यातील सर्व पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यामध्ये शिवसेनेचाही समावेश होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेनेच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस मुंबईतील नेते देखील उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास शिवसेना स्वतंत्र लढेल, असे शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी जाहीर केले होते.

शुक्रवारी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील सर्व नेत्यांची बैठक झाली. बैठकीस शिवसेनेचे खा. संजय मंडलिक उपस्थित होते. या बैठकीपुर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ( kolhapur district bank election ) पाच जागांची मागणी करण्यात आली होती. तसा प्रस्ताव ‘मातोश्री’वरून आल्याची चर्चा होती. तसेच यासंदर्भात मुंबईतून खा. संजय मंडलिक यांनाही फोन आला होता. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तो चर्चेचा विषय बनला होता.

या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी शनिवारी दुपारी चार वाजता शासकीय विश्रामधाम येथे तातडीची बैठक घेतली. बैठकीस खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आ. सत्यजित पाटील-सरुडकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, शिवसहकार सेनेचे संजय जाधव, सुनील मोदी, संग्राम कुपेकर, राजेखान जमादार आदी उपस्थित होते.

या बैठकीत खा. मंडलिक यांनी, शिवसेनेला जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, त्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले. शिवसेना नेते खा. अनिल देसाई, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या माध्यमातूनही जादा जागा मिळाव्यात याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु; याबाबत सत्ताधारी मंडळींकडून अद्याप कोणताही ठोस शब्द देण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सन्मानजनक जागा मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र घेत स्वतंत्र पॅनेल करण्याचे ठरले. सोमवारी दुपारी दोन वाजता पॅनेलची घोषणा करण्यात येणार आहे. यासंदर्भात माजी खा. निवेदिता माने यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून चर्चा करण्यात आली आहे, असे देवणे व जाधव यांनी सांगितले.

Back to top button