पन्नालाल सुराणा यांना शाहू पुरस्कार जाहीर | पुढारी

पन्नालाल सुराणा यांना शाहू पुरस्कार जाहीर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : यंदाचा प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जाहीर करण्यात आला आहे. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणार्‍या या पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी केली. शाहू जयंतीदिनी (दि. 26) शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी 6 वाजता खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, समाज प्रबोधन आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्ती, संस्थांना 1984 पासून हा पुरस्कार दिला जातो.

यंदाचा हा 38 वा पुरस्कार आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते.
सुराणा यांचे संपूर्ण जीवन समाजातील पीडित व शोषित वर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी समर्पित आहे. पुणे येथून बी.ए.एलएल.बी. पदवी घेतल्यानंतर बिहारमध्ये आचार्य विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्या भूदान चळवळीत ते सामील झाले. काही वर्षांनंतर ते महाराष्ट्रात परतले आणि समाजवादी पक्षाचे काम करू लागले. महागाईविरोधी आंदोलन, दुष्काळ निवारण, शेतकर्‍यांना जमीन हक्क, नामांतर, आणीबाणीविरोधी चळवळ आदीत सहभाग घेत त्यांनी सातवेळा तुरुंगवासही भोगला. एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटनेचे तसेच राष्ट्र सेवा दलाचे ते अध्यक्ष होते. लातूर येथील भूकंपामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी त्यांनी आपले घर हे वसतिगृह चालवून त्यांना आधार दिला.

Back to top button