पुलाची शिरोली येथे प्रेम प्रकरणातून तरूणाची निर्घृण हत्‍या | पुढारी

पुलाची शिरोली येथे प्रेम प्रकरणातून तरूणाची निर्घृण हत्‍या

शिरोली एमआयडीसी ; पुढारी वृत्तसेवा प्रेम प्रकरणातून तरूणीच्या नातेवाईकांनी धारधार शस्त्राने सपासप वार करून तरूणाचा निर्घृण खून केला. हि घटना (शुक्रवार) रात्री बारा वाजण्याच्या सुमार पुलाची शिरोली सांगली फाटा येथील मंगल कार्यालय येथे घडली. खून झालेला तरूण हा पाडळी ता. हातकणंगले येथील होता. तो आर्मीत भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र त्‍याचे आर्मीचे स्वप्न अपुरेच राहून गेले.

घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत तरूणाचे नाव संकेत संदीप खामकर (वय १९ रा. पाडळी ता. हातकणंगले) असे असून त्याचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबध होते. त्या मुलीच्या नातेवाईकांचा शिरोलीत बुधले मंगल कार्यालय येथे वाढदिवसाचा कार्यक्रम होता. संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्रास सोबत घेवून मंगल कार्यालय येथे आला असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजले. संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला. या वादातून नातेवाईकानी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले. ही घटना ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. तरुणावर हल्ला होत होता त्यावेळी कोणीच आडवण्यासाठी पुढे आले नाही. त्याच्या सोबत आलेल्या मित्रासही मुलीच्या नातेवाईकांनी मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईल ही काढून घेतला.

घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला. शिरोली फाटा येथे येवून अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटणेची माहिती दिली.

संकेतचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत संकेत रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडला होता. त्याच्या मदतीस कोणीच आले नव्हते. संकेतला वेळेवर उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता. संकेतचे आर्मीत भरती होण्याचे स्वप्न होते. तो लेखी परीक्षेत पास झाला ह़ोता. काही दिवसात त्याची शारिरीक व मैदानी परिक्षा होणार होती. त्यासाठी खूप प्रयत्न करत होता.

संकेत पाच वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तीच्या माहेरी निघून गेली. त्यानंतर आज पर्यंत संकेतचा सांभाळ त्याच्या आजी व चुलत्याने केला होता. संकेतचा सांभाळ लहानपणापासून त्याच्या आजी व चुलत्यानी केला होता. संकेतच्या खुनाच्या बातमीने पाडळीत खळबळ माजली आहे. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि पंकज गिरी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button