Chandrakant Jadhav : आ. चंद्रकांत जाधव यांचे अकाली निधन | पुढारी

Chandrakant Jadhav : आ. चंद्रकांत जाधव यांचे अकाली निधन

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : Chandrakant Jadhav : काँग्रेसचे कोल्हापूर उत्तरचे आमदार व प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत पंडितराव जाधव (अण्णा) (वय 57) यांचे पोटाच्या विकाराने हैदराबाद येथे गुरुवारी पहाटे निधन झाले. चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पोटावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. पण अचानक तब्येत बिघडल्याने गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

‘अण्णा पोरकं केलंत…’ अशा शब्दांत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हजारोंच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी जाधव यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी जयश्री जाधव, भाऊ संभाजी जाधव, मुलगा सत्यजित, मुलगी चेतना असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार, दि. 5 रोजी स. 9 वा. पंचगंगा स्मशानभूमीत होणार आहे.

‘आमदार जाधव यांच्या निधनाने उमदा सहकारी गमावला’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकभावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘अभ्यासू नेतृत्व हरपले’, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली. आ. जाधव यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यावर मात करून पुन्हा राजकीय व सामाजिक कार्यात ते सक्रिय झाले होते. सुमारे दीड वर्षापासून त्यांना सतत पोटाचा त्रास जाणवत होता. दहा दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले. नंतर पुढील उपचारासाठी ते हैदराबादला गेले. तेथे त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा त्यांना अस्वस्थ वाटू लागले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. हे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

कार्यकर्त्यांची निवासस्थानी गर्दी ( Chandrakant Jadhav )

सोशल मीडियावरून आ. जाधव यांच्या निधनाचे वृत्त वार्‍यासारखे पसरले. सत्यता पडताळण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या सम्राटनगर येथील निवासस्थावर गर्दी केली. अण्णा गेल्याचे वृत्त खरे असल्याचे समजताच त्यांना अश्रू अनावर झाले. दुपारी 1 वाजता जाधव यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात आले. प्रथम त्यांच्या ‘गोशिमा’ येथील कारखान्यासमोर ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर काँग्रेस कमिटीत त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. त्यात पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. संजय मंडलिक, आ. पी. एन. पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, आ. प्रकाश आबिटकर, राजू आवळे, ऋतुराज पाटील, ए. वाय. पाटील, प्रल्हाद चव्हाण आदींसह उद्योजक, व्यापारी व विविध पक्षांचे कार्यकर्ते यांचा समावेश होता.

दुपारी तीन वाजता जाधव यांचे पार्थिव सम्राटनगर येथील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील तसेच कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

सायंकाळी पाच वाजता त्यांच्या सम्राटनगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. सम्राटनगर, वाय. पी. पोवार नगर, हुतात्मा पार्क मार्गे पीटीएम तालीम, कैलासगडची स्वारी मंदिर, मंगळवार पेठ येथील निवासस्थान, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे पंचगंगा स्मशानभूमीत अंत्ययात्रा आली. तेथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

उद्योगाचा व्याप सांभाळत सामाजिक योगदान ( Chandrakant Jadhav )

चंद्रकांत जाधव यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी सलग दोनवेळा आमदार असलेल्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. निवडणूक तोंडावर आली असताना अचानक त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती. प्रचाराला वेळ कमी असतानाही योग्य नियोजन करून त्यांनी निवडणूक जिंकली. मोठ्या उद्योग समूहाचे मालक असतानाही जाधव यांची राहणी अगदी साधी होती. तालीम संस्था, गणेश मंडळे, शहरातील विविध पेठा यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांत ते सहज मिसळत असत. उद्योगांचा व्याप सांभाळत जाधव यांचे सामाजिक योगदानही मोलाचे होते. त्यांनी जाधव इंडस्ट्रीज, प्रेमला पिक्चर्स, जाधव टूल्स, जाधव बेव्हरेजेस, जाधव मेटल्स, प्रेमला इंडस्ट्रीजच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात यशस्वी घोडदौड केली. याबरोबरच शिक्षण, आरोग्य यांसह खेळाडूंना ते नेहमी मदत करत असत. जिल्ह्यातील गरजूंच्या मदतीला धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्वाधिक ओळख होती.

Back to top button