कोल्हापूर : प्रत्येक टप्प्यावर मी जनतेसोबतच : शाहू महाराज | पुढारी

कोल्हापूर : प्रत्येक टप्प्यावर मी जनतेसोबतच : शाहू महाराज

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी समतेचा विचार दिला. समतेशिवाय समाजाचा विकास नाही, यामुळे समतेचा कृतिशील संदेश देत समाजाच्या प्रत्येक घटकाच्या विकासाचा विचार केला. त्यांचेच विचार समोर ठेवून लोकांचे प्रतिनिधित्व करू, अशी ग्वाही देत सर्वसामान्यांच्या दैनंदिन जगण्याचे अनेक प्रश्न आहेत. विकासात्मक द़ृष्टिकोनातून त्यांच्या प्रत्येक प्रश्नांकडे पाहिले जावे, त्यातून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी आपली आंतरिक आणि मनस्वी भावना आहे. याच जाणिवेतून आजवर प्रत्येक टप्प्यावर जनतेच्या सोबत राहिलो, आजही त्यांच्यासोबत कायम असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून आपण राजकारणापासून अलिप्त होतो. मात्र आपण कधीही समाजकारणापासून दूर नव्हतो. समाजातील प्रत्येक घटकांच्या सोबत राहिलो आहे. यापुढेही कायम राहणार आहे. शेतकर्‍यांपेक्षा मोठा देशभक्त कोणीच नाही, हे मी नेहमीच सांगत आलो. कारण शेतीशिवाय मोठी उत्पादन संस्था नाही आणि अन्नधान्यापेक्षा कोणतेही मोठे उत्पादन नाही. यामुळे शेतकर्‍यांच्या आंदोलनात आपण त्यांच्या सदैव सोबत राहिलो.

छत्रपती घराणे आणि कोल्हापूरकर हे जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते आहे. यामुळे कोल्हापूरकरांच्या प्रत्येक हाकेला मी धावलो. जिथे जनतेवर अन्याय झाला, तिथे जनतेच्या सोबत राहून तो दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अन्यायी टोल आंदोलनात आपलाही सहभाग अग्रणीच होता. मराठा आरक्षणाचा प्रश्न असो, कोल्हापूरचा महापूर असो,

कोरोना सारखी महामारी असो, ज्या ज्या वेळी कोल्हापूरच्या जनतेवर संकट आले, त्या त्या वेळी या संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी आपण पुढे सरसावलो, जे जे शक्य ते ते केले. पण याची कधी जाहीरात केली नाही. त्याची कधीही गरजही वाटली नाही, कारण मी हे सगळे लोकांसाठी करत राहीलो, असेही शाहू महाराज यांनी सांगितले.

सामाजिक वातावरण गढूळ झाल्याचे आपण अनुभवत आहोत. समाजातील प्रत्येक घटक असमाधानी आहे. अशा परिस्थितीत, राजर्षी शाहू महाराज यांचे समतेचे विचार दिल्लीत गेले पाहिजेत. संविधान वाचले, तर लोकशाही टिकेल आणि लोकशाही टिकली तरच घटनेने दिलेले हक्क आणि अधिकार कायम राहतील, याच भावनेने निवडणुकीत उतरलो. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील तीनही पक्षांसाठी मी सर्वमान्य उमेदवार ठरलो. सर्वच पक्षाचे पर्याय खुले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदानाची मोठी परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाची विचारधारा आपणाला जवळची वाटली. आघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्याला पक्ष निवडीचे स्वातंत्र्य दिले होते, हा त्यांचा मोठेपणा आहे. माझ्या निर्णयाला जनतेनेही साथ दिली, सर्वांनी उमेदवारीचे स्वागत केले आणि मी जनतेचाच उमेदवार ठरलो.

सर्वसामान्यांची प्रगती हाच माझा संकल्पनामा आहे, तो मी जाहीर केला आहे. हा संकल्पनामा सत्यात उतरण्यासाठी माझे अथक प्रयत्न राहतील, यासाठी प्रत्येक तालुक्यात जनसंपर्क कार्यालय सुरु होईल. लोकांची सोय होण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या कार्यालयात पूर्व कल्पना देवून लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहण्याची काळजी घेतली जाईल. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्य कार्यालयातील यंत्रणा अधिक सक्षम करू. जिल्ह्याला विकासाच्या प्रचंड संधी आहेत. मग त्या उद्योगधंद्यात असो अथवा पर्यटनात असो. नैसर्गिक साधन संपत्ती असो वा पायाभूत सुविधा असो, या प्रत्येकातील संधीचे सोने झाले पाहिजे,त्यातून रोजगार निर्माण झाला पाहिजे, त्यातून जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. त्याकरीता आपल्या संकल्पनाम्यात त्यावर अधिक भर दिल्याचेही शाहू महाराज यांनी सांगितले.

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा मी कृतीशील वारसदार आहे. त्यांचे विचार कृतीतून पुढे नेण्याचा आपला सातत्याने प्रयत्न सुरू आहे, राजर्षी शाहूंचा वारसदार असल्याचा मला अभिमानच आहे, असेही शाहू महाराज यांनी सांगितले.

Back to top button