राजर्षींच्या रक्तामांसाचा मीच खरा वारस; शाहू महाराज संपत्तीचे वारस; राजवर्धन कदमबांडे यांचा दावा | पुढारी

राजर्षींच्या रक्तामांसाचा मीच खरा वारस; शाहू महाराज संपत्तीचे वारस; राजवर्धन कदमबांडे यांचा दावा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राजर्षी शाहू छत्रपतींच्या रक्तामांसाचा खरा वारस मीच आहे. जे वारसाचा दावा करतात, ते संपत्तीचे वारसदार असू शकतात. ज्या आधारे वारसाचा दावा केला जातो, त्या दत्तक विधानासाठी छत्रपती शहाजी महाराज यांना कोल्हापुरात जागा मिळाली नाही. दत्तक विधान कोल्हापुरात झालेले नाही. त्यामुळे कोण वारस, वारसावर टीका, गादीचा वारस हे प्रश्नच उद्भवत नसल्याचे छत्रपती राजाराम महाराज यांचे नातू आणि प्रिन्सेस पद्माराजे कदमबांडे यांचे सुपुत्र राजवर्धन कदमबांडे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंडलिक, माने यांना विजयी करा

कोल्हापुरात संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांना विजयी करण्याचे आवाहन आपण कोल्हापूरच्या जनतेला करत आहोत, असेही कदमबांडे म्हणाले. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण कोल्हापुरात आलो आहे. आमचे काही कौटुंबिक वाद आहेत. त्याविषयी न्यायालयीन लढा सुरू अहे. तो लढा आम्ही लढू, मात्र 1962 साली कोल्हापुरात दत्तक प्रकरण गाजले. छत्रपती शहाजी महाराज यांनी ज्यांना दत्तक घ्यायचे ठरविले ते कोल्हापूरच्या जनतेला मान्य नसल्यामुळे हे प्रकरण गाजले. त्याविरुद्ध कोल्हापूर शहर व जिल्ह्यात मोठे आंदोलन झाले. या आंदोलनामुळे शहाजी महाराज यांना त्यांचा नियोजित दत्तक घेण्यासाठी कोल्हापुरात जागाच राहिली नाही. त्यामुळे हे दत्तक विधान कोल्हापुरात झाले नसल्याने गादीचा मान हा प्रश्नच येत नाही. दत्तक विधान झाले की नाही, कोठे झाले याबाबत कोणालाही माहिती नाही. मात्र त्यांनी घेतलेले दत्तक हे शहाजी छत्रपती यांच्या संपत्तीचे वारस होऊ शकतात, गादीचा वारसा ते सांगू शकत नाहीत, असा दावाही कदमबांडे यांनी केला.

मी केवळ राजर्षी शाहूरायांच्या रक्तामांसाचा वारस नाही तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा खरा वारसदार आहे. या नात्यानेच कोल्हापूरच्या जनतेला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या विजयाचे आवाहन करण्यासाठी आलो आहे. कोणताही जुना वाद उकरून काढलेला नाही. जो लढा सुरू आहे तो लढूच. हा आमचा घरगुती वाद आहे. यावर मला सार्वजनिक चर्चा करावयाची नाही. राजर्षींचा वारसदार आणि भाजपचा कार्यकर्ता म्हणून केवळ महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे. भाजपने आपल्यावर कोल्हापूर व हातकणंगले लाकेसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. त्याचबरोबर धुळे जिल्ह्याचा भाजपचा मी निवडणूक प्रचारप्रमुख असल्याचे कदमबांडे यांनी आवर्जून सांगितले.
कोल्हापुरात 1984 साली लोकसभा निवडणूक लढविली होती, असे सांगून कदमबांडे म्हणाले, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गेल्या 25 वर्षांपासून मी अध्यक्ष आहे. विशेष म्हणजे धुळे व नंदूरबार या दोन जिल्ह्यांची ही राज्यातील एकमेव बँक आहे. यापूर्वी आपण धुळ्यातून आमदार म्हणूनही निवडून आलो आहे.

मंदिरे आणि धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्याचा मुस्लिम राज्यकर्त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमसारख्या पक्षाने शाहू महाराज यांना दिलेल्या पाठिंब्याकडे आपण कसे पाहता, असे विचारले असता कदमबांडे यांनी, ज्यांनी पाठिंबा घेतला त्यांनाच हा प्रश्न विचारा, असे म्हणत धुळ्यातून एमआयएम उमेदवाराकडून आपला पराभव झाल्याचे सांगितले.

जर सध्याच्या महाराजांचे दत्तक विधान झाले नसेल तरीही शहाजी महाराज हे देखील कोल्हापुरात दत्तकच आले होते. त्यांच्याबाबत आपली भूमिका काय? त्यांना आपण काय मानता? असे विचारता कदमबांडे यांनी शहाजी महाराज हे छत्रपती राजाराम महाराज यांचे नात्याने भाचे होते. बि—टिश काळात राजगादी रिकामी ठेवता येत नव्हती, त्यामुळे त्यांचे दत्तक विधान झाले. ते मूळचे देवासचे विक्रमसिंह पवार होत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

विद्यमान शाहू महाराज यांनी राजर्षी शाहूंच्या कार्याला साजेसे कार्य केले नाही, अशी टीका त्यांच्यावर केली जाते, असा प्रश्न विचारताच कदमबांडे यांनी ते बरोबर आहे, असे उत्तर दिले. तसे असेल तर राजर्षी शाहूंच्या विचारासाठी आपण काय केले, या प्रश्नावर बोलताना कदमबांडे यांनी, आपण राजर्षी शाहू छत्रपतींचा विचार जनतेपर्यंत घेऊन गेलो आहोत. राजर्षींच्या विचारांचा जागर आपण सुरू ठेवला आहे, आजही असाचा विचार पुढे नेण्यासाठी नेहमीच काम करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

राजर्षी शाहू छत्रपतींच्या पुरोगामी विचारांचा वारसा असताना आपण भाजपचा प्रचार करत आहात. हे कसे काय, असे विचारले असता कदमबांडे यांनी, राजर्षी शाहूंचा विचारांचा वारसा भाजपही चालवत आहे. त्यामुळे आपण चुकीचे काय केले, असा प्रतिसवाल केला.
1984 च्या निवडणुकीत इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर आपण आताच सक्रिय झाला आहात. कोल्हापूर टार्गेट केले आहे काय, असे विचारले असता कदमबांडे म्हणाले, भाजपने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. 1984 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कोल्हापुरातच वास्तव्यास होतो. जुना राजवाड्यात आजी विजयमाला महाराणीसाहेब यांच्याकडे मी व माझ्या मातोश्री प्रिन्सेस पद्माराजे कदमबांडे राहात होतो. विजयमाला महाराणीसाहेब यांच्या निधनानांतर आपण धुळ्याला गेलो व तेथील राजकारणात सक्रिय झालो. या पत्रकार परिषदेला किरण शिंदे, बापूसाहेब निंबाळकर, सत्यजित कदम आदी उपस्थित होते.

Back to top button