कोल्हापूर : टोळीयुद्धातून गोळीबार; म्होरक्यासह दोघांना अटक | पुढारी

कोल्हापूर : टोळीयुद्धातून गोळीबार; म्होरक्यासह दोघांना अटक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जवाहरनगर येथील सरनाईक वसाहतीत टोळीयुद्धातून झालेल्या बेछूट गोळीबारप्रकरणी एम. एस. कंपनी गँगच्या म्होरक्यासह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण व राजारामपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री जेरबंद केले. सद्दाम सत्तार मुल्ला (वय 35) व साहिल रहिम नदाफ (22, दोघेही रा. मेन रोड यादवनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, कुख्यात शस्त्र तस्कर मनीष नागोरी याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय आहे. गुन्हा दाखल झालेल्यांत सद्दाम मुल्ला, साहिल नदाफ, तस्कर नागोरीसह मोहसीन मुल्लाचा समावेश आहे. न्यायालयाने संशयितांना 5 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

उर्वरित दोन हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके विविध भागांत रवाना करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर, निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.
हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या साद शौकत मुजावर (वय 25, रा. यादव कॉलनी, सरनाईक वसाहत) याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या मांडीत घुसलेली गोळी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात आल्याने धोका टळला आहे, असेही सांगण्यात आले. गोळीबाराच्या घटनेमुळे सोमवारी दिवसभर परिसरात तणाव होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रतिस्पर्धी टोळ्यांतील वाद नडला

मुख्य संशयित सद्दाम मुल्ला याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील सर्वच संशयितांशी साद मुजावर याचे सलोख्याचे संबंध असल्याने मुल्ला हा मुजावरवर डुख धरून होता. त्यांच्याशी संबंध ठेवू नको, असे सांगत सद्दामने मुजावरला दोन-तीनवेळा खडसावले होते. तरीही त्यांच्यात दोस्ताना कायम होता.

पाठलाग करून हल्ला

रविवारी सायंकाळी याच कारणातून सद्दाम मुल्ला व साद मुजावर यांच्यात वाद झाला होता. तुला सोडत नाही, अशी धमकी मुल्ला याने दिली होती. रात्री उशिराही त्यांच्यात मोबाईलवरून शिवीगाळ आणि एकमेकांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर काही काळात सहा-सातजणांच्या जमावाने मुजावर याचा पाठलाग करून हल्ला केला. गोळीबारात जखमी झालेल्या मुजावर याच्या डोक्यात धारदार शस्त्राने प्रहार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला.

संशयित सद्दाम मुल्ला हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या चार गुन्ह्यांची नोंद असल्याचे निरीक्षक तनपुरे यांनी सांगितले. संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व प्राणघातक शस्त्र कब्जात बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button