हिमोफिलियाची बाधा तपासणे आवश्यक; प्रसिद्ध हिमॅटोलॉजिस्ट डॉ. वरुण बाफना यांचा सल्ला | पुढारी

हिमोफिलियाची बाधा तपासणे आवश्यक; प्रसिद्ध हिमॅटोलॉजिस्ट डॉ. वरुण बाफना यांचा सल्ला

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : मानवी शरीरामध्ये कोणताही रक्तस्राव हा दुर्लक्ष करण्याजोगा आजार नाही. विशेषतः स्त्रियांनी मासिक पाळीच्या वा रजोनिर्मितीच्या काळात होणारा रक्तस्राव अतिरिक्त कालावधीसाठी सुरू राहिला, तर त्याकडे सहजतेने न पाहता तातडीने त्याची वैद्यकीय चिकित्सा आणि अचूक निदान करणे आवश्यक आहे; कारण आता अशा प्रकारची लक्षणे असलेल्या स्त्रियांमध्ये चाचण्यांतर्गत ‘हिमोफिलिया’ या आजाराचे मूळ सापडू लागले आहे. यामुळे कोणताही रक्तस्राव आणि विशेषतः स्त्रियांनी आपल्या मासिक पाळीदरम्यान होणार्‍या अतिरिक्त रक्तस्रावाची तातडीने चाचणी करून घेणे आवश्यक आहे; कारण या चाचण्यांमध्ये जरी ‘हिमोफिलिया’ आढळला, तरी पहिल्या टप्प्यातील होणार्‍या निदानामध्ये तो नियंत्रित करता येतो आणि सर्वांत विशेष म्हणजे दशकभरापूर्वी ज्या आजारावर उपचारासाठी 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च येत होता, ते उपचार कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात संपूर्णतः मोफत करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये 17 एप्रिल हा जागतिक बहुरक्तस्राव (हिमोफिलिया) दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी विविध देशांमध्ये अभियान उभारले जाते. लक्षणांवरून रुग्णाची तपासणी आणि त्याच्यावर उपचाराचा सल्लाही दिला जातो. कोल्हापूरचे प्रसिद्ध रक्तविकारतज्ज्ञ (हिमॅटॉलिॉजिस्ट) डॉ. वरुण बाफना यांनी या आजाराविषयी जनजागृतीचे जोखड आपल्या खांद्यावर घेतले आहे. डॉ. बाफना यांनी राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपली मानद सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या मते जगभरात अतिप्रगत म्हणून वापरल्या जाणार्‍या जीन थेरपीव्यतिरिक्त ‘हिमोफिलिया’वरील सर्व प्रगत उपचार, तेही मोफत स्वरूपात सीपीआरमध्ये उपलब्ध असल्याने नागरिकांनी याविषयी सतर्क राहणे आणि आपल्या चाचण्या करून उपचाराची कास पकडणे आवश्यक असल्याचे दैनिक ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

‘हिमोफिलिया’ हा रक्त गोठण्याशी संबंधित आजार आहे. त्याला आनुवंशिकतेचीही एक किनार आहे. या आजारामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया आपले कार्य व्यवस्थितरीत्या पूर्ण करीत नाही. यामुळे जखम झाली की, रक्तस्राव थांबत नाही. सहज जखम होते आणि सांधे किंवा मेंदूत रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. यामुळे सांध्यामध्ये होणार्‍या रक्तस्रावाने रुग्णाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते, तर मेंदूतील रक्तस्त्राव दीर्घकाळपर्यंत डोकेदुखी, फेफरे येणे अथवा चेतनेची पातळी कमी करू शकतो. या आजारावर त्याच्या गांभीर्यानुसार अनेक उपचारपद्धती विकसित झाल्या आहेत. यासाठी रक्त गोठविणारे घटक संबंधित रुग्णाला दिले जातात. रक्तातून हे घटक अलग करून रिकॉम्बिनन्ट पद्धतीने आठवड्यातून आजाराच्या तीव्रतेनुसार तीन ते चार वेळेला हे घटक दिले जातात. हा एक दीर्घकालीन लढा आहे. पण यामुळे आजार नियंत्रित राहतो. अशा रुग्णांना कोणत्याही क्षणी रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यांना तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज असते आणि महागड्या औषधोपचारांचा सरंजामही सोबतीला असावा लागतो. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च हे मोठे आव्हान होते. महाराष्ट्र शासनाने हा प्रश्न सोडविला. यामध्ये आज मुंबईतील केईएम रुग्णालयाबरोबरच कोल्हापुरात सर्व अतिप्रगत उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी पुढे येण्याची गरज आहे.

‘हिमोफिलिया’ म्हणजे अतिरिक्त रक्तस्त्राव. हा विषय तसा जुना आहे. या आजाराचा पहिला शोध अरब सर्जन अल जहरावी यांनी लावला. दहाव्या शतकामध्ये अल जहरावी यांनी एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या अर्भकाची सुंता केल्यानंतर होणार्‍या रक्तस्त्रावाने अर्भक दगावल्याचे पाहिले होते. याच अर्भकाच्या पाठोपाठ संबंधित मातेला झालेले दुसरे अपत्यही सुंता केल्यानंतर झालेल्या रक्तस्त्रावाने मरण पावले. या दोन निरीक्षणातून तिसर्‍या अर्भकावेळी अल जहरावी यांनी सुंता न करण्याचा सल्ला दिला आणि अपत्य वाचले. त्यानंतर त्याचा वैज्ञानिक शोध सुरू झाला आणि या रोगाचे विविध पैलू प्रकाशात येऊ लागले. भारतामध्ये या आजाराने प्रभावित असलेले नोेंदणीकृत 70 हजार रुग्ण आहेत. महाराष्ट्रात त्यांची संख्या 4 हजारांवर आणि कोल्हापूरच्या ‘हिमोफिलिया’ सोसायटीच्या नोंदवहीत 500 हून अधिक रुग्ण नोंदविले गेले आहेत. या रुग्णांव्यतिरिक्त नोंदविले न गेलेले तितकेच रुग्ण असतील, असा कयास बांधला जातो आहे.

‘हिमोफिलिया’ या आजारामध्ये दोन प्रकार आहेत. त्यासाठी रोगप्रतिबंधक उपचार (प्रोफायलेक्सिक, अविरोध करणारे घटक, इनहेबिटर्स) ग्रोथ फॅक्टर्स, जीन थेरपी यांचा वापर केला जातो. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आता उपचारा दरम्यान इंजेक्शन्स घेण्याच्या कालावधीतही वाढ करता येणे शक्य झाले आहे. हे सर्व उपचार केवळ खर्चाच्या भीतीमुळे नागरिकांपासून दूर होते. आता त्यावरील सर्व औषधे व उपचार मोफत केल्यामुळे रुग्णांसाठी ते वरदान आहे. पण त्यासाठी लक्षणे दिसणार्‍या विशेषतः असमान्य रक्तस्त्रावाच्या रुग्णांनी सीपीआर रुग्णालय गाठणे गरजेचे आहे.

Back to top button