omicron : कोल्हापुरात मास्क सक्ती | पुढारी

omicron : कोल्हापुरात मास्क सक्ती

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमायक्रॉन’ omicron अधिक धोकादायक असल्याने प्रशासनाकडून पुन्हा निर्बंध कडक केले जात आहेत. त्यानुसार साधा मास्क अथवा रुमाल वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. साध्या मास्कऐवजी एन 95 अथवा तीन पदरी कापडी किंवा सर्जिकल मास्कच वापरा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी केले. कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात लागू केलेल्या नियमावलीची गुरुवारपासून अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘ओमायक्रॉन’ omicron वेगाने फैलावत असल्याने त्याकरिता साधा मास्क उपयोगी ठरत नाही. यामुळे एन 95 अथवा तीन पदरी कापडी किंवा सर्जिकल मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. साधा मास्क अथवा रुमाल लावलेले कोणी आढळले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल. प्रत्येकवेळी त्यांच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जाईल, असेही रेखावार यांनी स्पष्ट केले.

एन 95 अथवा तीन पदरी कापडी किंवा सर्जिकल मास्क नसलेल्या ग्राहकाला प्रवेश देणार्‍या दुकाने, कार्यालये, पेट्रोल पंप आदी संस्था, आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार असून, प्रत्येकवेळी त्यांच्याकडूनही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.

नमुने तपासणीसाठी पाठवणार

जिल्ह्यात अद्याप नव्या omicron व्हेरियंटची लागण झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास असलेल्या अथवा परदेशातून आलेल्यांच्या संपर्कात आली आहे आणि ज्यांची लक्षणे तीव— स्वरूपाची अथवा बर्‍याच कालावधीसाठी दिसत आहेत, अशांसह काही नमुने तपासणीसाठी पाठवले जातील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशावर मर्यादा

मंगळवारी दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. मास्क नसणार्‍यांसह महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त कोणालाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. अशाच पद्धतीने अन्य शासकीय कार्यालयांतील गर्दीवरही नियंत्रण आणले जाणार आहे. त्याचीही अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.

Back to top button