Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठेची लढाई; चुरस वाढली | पुढारी

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठेची लढाई; चुरस वाढली

मारुती पाटील

शिराळा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या शिराळा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारसंघातील इच्छुक नेते आपल्या सोयीची भूमिका घेतील, असे चित्र आहे. तिरंगी लढतीत कोण मताधिक्य घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वर्चस्व आहे. या पक्षाचे आ. मानसिंगराव नाईक प्रतिनिधित्व करीत आहेत. शिवाय या मतदारसंघात येणार्‍या वाळवा तालुक्यातील 48 गावांतही प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणारे गट आहेत. माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी भाजपमधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांचे वर्चस्व असलेली गावेही याच मतदारसंघात येतात. काँग्रेसचे मतदानही पाटील यांच्या पाठीशी असेल. शिराळा मतदारसंघाला लागूनच सत्यजित पाटील यांचा शाहूवाडी मतदारसंघ येतो. शिवाय त्यांचे वडील बाबासाहेब पाटील हे आ. मानसिंगराव नाईक यांच्या विश्वास साखर कारखान्याचे अनेक वर्षे उपाध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा या मतदारसंघाशी तसा पूर्वीपासून संपर्क आहे. त्यामुळे या मतदारसंघातून चांगले मताधिक्य घेण्याची संधी सत्यजित पाटील यांना आहे.

मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे फारसे प्राबल्य नसले, तरी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख सत्यजित देशमुख, विधानसभा मतदारसंघ प्रमुख सम्राट महाडिक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या गटांची ताकद आहे. मतदारसंघातील विकासकामे व महायुतीची वाढलेली ताकद यामुळे येथे माने यांना मताधिक्य मिळेल, असा विश्वास वाटतोय; मात्र गत निवडणुकीत येथे राजू शेट्टी यांनी मानेंपेक्षा 20 हजार 824 इतके मताधिक्य घेतले होते. शेट्टी यांना 98 हजार 646, तर माने यांना 77 हजार 422 मते पडली होती. या निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पाठीशी कोणताच राजकीय पक्ष नसल्याने त्यांची मदार सामान्य मतदारांवरच असेल. ऊसदराच्या प्रश्नामुळे शेतकरीवर्ग आपल्या पाठीशी राहील, अशी शेट्टी यांना खात्री असली, तरी प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावणार हे निश्चित असल्याने शेट्टींसमोर मताधिक्य कायम राखण्याचे आव्हान असेल.

विधानसभेची रंगीत तालीम

लोकसभेची ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे उमेदवार कोण, यापेक्षा येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या मतांचा फायदा आपल्याला होईल, याद़ृष्टीने मतदारसंघातील नेत्यांच्या चाचपण्या सुरू आहेत. विधानसभेचे गणित डोळ्यांसमोर ठेवूनच नेत्यांची मोर्चेबांधणीही सुरू आहे. यानिमित्ताने मतदारसंघातील राष्ट्रवादी व भाजप पक्षाची ताकदही कळणार असल्याने दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल.

Back to top button