कोल्हापूर : संशोधकांकडून पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध | पुढारी

कोल्हापूर : संशोधकांकडून पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील वायव्येकडील घाटामधून निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लावण्यात शिवाजी विद्यापीठ व ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश आले आहे. याची दखल प्राणीशास्त्राच्या क्षेत्रातील आघाडीच्या ‘झूटॅक्सा’ या शोधपत्रिकेने घेतली आहे. ऑकलंड (न्यूझीलंड) येथील शोधपत्रिकेने संशोधनाला वाहिलेला 114 पृष्ठांचा विशेषांक मंगळवारी प्रकाशित केला. हा विद्यापीठासह महाराष्ट्रातील युवा संशोधकांचा बहुमान आहे.

विद्यापीठ प्राणीशास्त्र अधिविभागातील अक्षय खांडेकर यांच्या पीएच.डी. संशोधनाचा हा भाग आहे. डॉ. सुनील गायकवाड त्याचे मार्गदर्शक आहेत. संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे, सत्पाल गंगलमाले व डॉ. ईशान अगरवाल यांचा सहभाग आहे. यांनी ‘अ प्रिलिमिनरी टॅक्सॉनॉमिक रिव्हिजन ऑफ दि गिरी क्लेड ऑफ साऊथ एशियन निमास्पिस स्ट्रॉऊच, 1887 (स्क्वामाटा : गेक्कोनीडे) विथ दि डिस्क्रिप्शन ऑफ फोर न्यू स्पेसीज फ्रॉम साऊथ महाराष्ट्र, इंडिया’ हा 114 पानांचा प्रदीर्घ शोधनिबंध सादर केला. यास स्वतंत्र आयएसबीएन क्रमांक मिळाला आहे.

‘निमास्पिस बर्कीएन्सिस’ प्रजातीचा शोध कोल्हापूरमधील बर्की (शाहूवाडी), वाशी (ता. पन्हाळा) व तळये बुद्रुक (गगनबावडा) याठिकाणी लागला आहे. ‘निमास्पिस चांदोलीएन्सिस’ ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील चांदेल रेंजमध्ये आढळून आली. चांदोली ‘निमास्पिस महाराष्ट्राएन्सिस’ ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील रुंदीव रेंजमध्ये आढळली. ‘निमास्पिस सह्याद्री एन्सिस’ प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या वेत्ती रेंजमध्ये आढळून आली.

निमास्पिस कुळातील पाली त्यांच्या प्रदेशनिष्ठतेसाठी ओळखल्या जातात. त्यांचे आढळक्षेत्र छोट्या भूप्रदेशावर विस्तारलेले असते. थंडाव्याच्या जागांशिवाय त्या तग धरू शकत नाहीत. संशोधन मोहिमेत नव्याने शोधलेल्या पाली त्यांचे आढळक्षेत्र सोडून अन्यत्र कुठे आढळल्या नाहीत. चांदोली राष्ट्रीय उद्यानामधून शोधलेल्या तीन प्रजाती एकमेकांपासून 8 ते 12 किलोमीटर अंतरावर आढळल्या. गर्द झाडीच्या जंगलात पसरलेल्या उघड्या माळसदृश सड्यांनी प्रजातींचा वावर सीमित केला असावा, अशी टोकाची प्रदेशनिष्ठता हे निमास्पिस कुळातील पालींचे वैशिष्ट्य असल्याचे डॉ. गायकवाड व खांडेकर यांनी सांगितले.

निमास्पिस गिरी गटाच्या वैशिष्ट्यांची नव्याने मांडणी

यापूर्वी झालेल्या संशोधनांमधून निमास्पिस गिरी गटात महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातून दहा प्रजाती नोंदवल्या होत्या. यापैकी बहुतांश प्रजातींच्या वर्गीकरणामधील विसंगती, चुकांमुळे निमास्पिस गिरी गटातील पालींवर नव्याने अभ्यास करणे आव्हानात्मक होते. संशोधनांतर्गत जुने नमुने तपासण्यात आले. पूर्वीपासून ज्ञात प्रजातींच्या आढळक्षेत्रामधून नव्याने नमुने गोळा करून त्यांच्यात स्थिर राहणारी बाह्य वैशिष्ट्ये  नव्याने मांडण्यात आली. याची दखल ‘झूटॅक्सा’सारख्या प्रतिष्ठित जर्नलने घेतली, याचा आनंद मोठा असल्याची भावना खांडेकर यांनी व्यक्त केली.

अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका

मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलच्या रांगांची संख्या, शेपटीच्या खालच्या बाजूला असणार्‍या खवल्यांच्या रचना व विशिष्ट जनुकीय संचांवरुन या पाली एकमेकांपासून व कुळातील इतरांपासून वेगळ्या प्रजातीच्या आहेत. चार पाली दिनचर आहेत. झाडांचे बुंधे व दगडांच्या आडोशाने त्या वावरतात. छोटे किटक त्यांचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे अन्नसाखळीत समतोल राखण्यात पाली महत्त्वाची भूमिका बजावतात, असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

Back to top button