कोल्हापूर : कळंबा जेलमधील कुख्यात टोळ्यांच्या हालचालींवर करडी नजर ! | पुढारी

कोल्हापूर : कळंबा जेलमधील कुख्यात टोळ्यांच्या हालचालींवर करडी नजर !

दिलीप भिसे

कोल्हापूर : कारागृहे म्हणजे गुन्हेगारी वर्तुळातील नव्या-जुन्या समाजकंटकांची चालती-बोलती शाळा… इथे गुन्हेगारीचं प्रशिक्षण अन् प्रात्यक्षिकही अनुभवायला येतं… गंभीर गुन्ह्यांची कला अवगत होते. शिवाय, विनासायास गैरमार्गाने कमाईसाठी ट्रेनिंगही मिळू शकतं. चार भिंतीआड कोठडीत राहून बाह्य वातावरणात दहशत माजवून गुंडागर्दी करणार्‍या समाजकंटकांवर भविष्यात कायद्याचा कडक वचक राहणार आहे. मध्यवर्ती, जिल्हा कारागृहे व सर्कलमध्ये 140 सीसीटीव्हीद्वारे संघटित टोळक्यांच्या हालचालीवर रात्रंदिवस करडी नजर राहणार आहे.

मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह मराठवाडा व विदर्भात अलीकडच्या काळात सराईत गुन्हेगारी टोळ्यांच्या गंभीर गुन्ह्यांचे कटकारस्थान जिल्हा व मध्यवर्ती कारागृहात शिजल्याचे उघड झाले आहे. राज्यभर बहुचर्चित ठरलेल्या कोट्यवधींच्या अमली तस्करीचे कनेक्शनही कारागृहात शिक्षा भोगणार्‍या तस्करापर्यंत पोहोचले आहे. एव्हाना स्थानिक तस्करी टोळ्यांसह गुंडांच्या म्होरक्यांचे बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंड येथील टोळ्यांचे लागेबांधेही उघड झाले आहेत.

बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवरील सशस्त्र दरोड्यासह लूटमारीच्या जिल्ह्यातील दहा ते बारा गुन्ह्यांत आंतरराज्य टोळ्यातील सराईतांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. मध्यवर्ती कळंबा व जिल्हा कारागृहात एकत्रित कारावास भोगत असताना झालेल्या ओळखीचे संघटित टोळ्यांमध्ये रूपांतर झाल्याचा प्रकार कोल्हापूर पोलिस दलाच्या चौकशीत निष्पन्न झाला आहे.

आंतरराज्य कुख्यात टोळ्यांचा शहरी, ग्रामीण भागात होणारा फैलाव आणि गंभीर गुन्ह्यांत सक्रिय सहभाग लक्षात घेता गृहमंत्रालयाने कारागृह प्रशासनाच्या साहाय्याने गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया रोखण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबविण्याचा निर्धार केला आहे. राज्यातील सर्वच जिल्हा व मध्यवर्ती कारागृहात विशेष करून सर्कलमध्ये सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित करून स्थानिक आणि आंतरराज्य टोळ्यातील गुन्हेगारांच्या हालचाली व संपर्कावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

नक्षलवाद्यांसह परदेशी, ‘मोका’ कैद्यांसाठी कडेकोट सुरक्षा

कळंबा जेलमधील कोठडीत नक्षलवाद्यांसह 6 परदेशी कैद्यांसह ‘मोका’अंतर्गत कारवाई झालेल्या संघटित टोळ्यांमधील 236 संशयित बंदिस्त आहेत. याशिवाय धोकादायक आणि 47 पळपुट्या कैद्यांचा समावेश आहे. अन्य राज्यांतील अनेक खतरनाक कैदी चार भिंतीआड कोठडीत बंदिस्त असल्याने त्यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यांच्यावर सीसीटीव्ही यंत्रणेची करडी नजर ठेवण्यात आली आहे.

140 सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित

कोल्हापूर येथील मध्यवर्ती कळंबा व बिंदू चौकातील जिल्हा कारागृहात सीसीटीव्हीची यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कळंबा कारागृहात 140 सीसीटीव्हीद्वारे कैद्यांच्या हालचालीवर रात्रंदिवस करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यासाठी अधिकारी व सुरक्षा रक्षकांचीही फौज तैनात करण्यात आली आहे.

Back to top button