मँचेस्टरनगरीची नवीन ओळख ‘एम.एच. ५१’ | पुढारी

मँचेस्टरनगरीची नवीन ओळख ‘एम.एच. ५१’

पंकज चव्हाण

इचलकरंजी : महाराष्ट्राचे मँचेस्टर आणि कबड्डी-खोखोची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वस्त्रनगरी इचलकरंजीची आता ‘एमएच 51’ अशी आणखी एक नवीन ओळख झाली आहे. मागील वर्षी 25 मे रोजी इचलकरंजी शहरास ‘एमएच 51’ हे पासिंग प्रादेशिक परिवहनकडून देण्यात आले. 8 मार्च रोजी पासिंग होणार्‍या सर्व गाड्या ‘एमएच 09’ने होणार; तर सोमवार (11 मार्च)पासून सर्व वाहनांना ‘एमएच 51’ हे पासिंग देण्यात येणार आहे. यामध्ये ‘एमएच 51’ ही मालिका दुचाकी वाहनांसाठी असणार आहे. तर ‘एमएच 51 ए’ ही मालिका कारसाठी तसेच ‘एमएच 51 बी’ ही मालिका भाडोत्री वाहनांसाठी असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला ‘एमएच 09’ या आरटीओ पासिंगने देखील ओळखतात. मात्र ‘एमएच 51’ हा क्रमांक आता इचलकरंजीकरांना मिळणार आहे. कोल्हापूर परिवहन कार्यालयात होणारी सर्व कामे आता इचलकरंजी शहापूर विश्रामगृहाच्या कार्यालयात होणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

सोमवारपासून दुचाकी, चारचाकी, भाडोत्री वाहनांची ‘एमएच 51’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. इचलकरंजी शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर आता इचलकरंजीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यानुसार इचलकरंजीला एमएच 51 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय मिळाले आहे.

गेल्या काही वर्षांत इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची मागणी वाढली आहे; तर येथील नागरिकांना आरटीओसंदर्भात कोणतीही कामे असतील तर ती करण्यासाठी त्यांना कोल्हापूर शहरात यावे लागायचे. यामध्ये अनेक लोकांचा दिवस जायचा. कामे खोळंबायची. यामुळे गेल्या काही वर्षांपासून आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजी शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन व्हावे यासाठी प्रयत्न करत होते आणि आता त्यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे. 11 मार्च रोजी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पहिले वाहन एमएच 51 द्वारे पासिंग करण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये झालेली वाढ पाहता आणि यात विशेषतः इचलकरंजी शहरातील स्थिती पाहता राज्य सरकारने इचलकरंजी शहराला महानगरपालिकेचा दर्जा दिला आहे. यामुळे नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले आहे. यामुळे इचलकरंजी शहराला मँचेस्टर सिटीबरोबरच आता ‘एमएच 51’ अशी नवीन ओळख मिळाली आहे.

व्हीआयपी क्रमांकासाठी अनेक वाहनधारक इच्छुक

इचलकरंजी शहरातील अनेकांना अजूनही ‘एमएच 09’ हे पासिंग पाहिजे होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेकांनी ‘एमएच 09’ हे पासिंग कोल्हापुरातून करून घेतले. परंतु इथून पुढे हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील सर्व वाहनांना ‘एमएच 51’ हेच पासिंग देण्यात येणार आहे. ‘एमएच 51’ तसेच पुढील क्रमांक व्हीआयपी मिळावा यासाठी इचलकरंजी परिसरातील अनेक वाहनधारक इच्छुक आहेत.

येत्या सोमवारपासून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाप्रमाणे वाहन हस्तांतर, लर्निंग लायसन तसेच पर्मनंट लायसन्सची सर्व कामे शहापूर विश्रामगृह येथील आरटीओ कार्यालयात पूर्णवेळ सुरू होणार आहेत. व्हीआयपी क्रमांकासाठी पुढील आठवड्यापासून काम सुरू होईल.
– दीपक पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, इचलकरंजी

Back to top button