मुदत संपूनही दुसरा डोस न घेणार्‍या नागरिकांची संख्या पावणेतीन लाख | पुढारी

मुदत संपूनही दुसरा डोस न घेणार्‍या नागरिकांची संख्या पावणेतीन लाख

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवस पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 2 लाख 88 हजार 964 इतकी आहे. जिल्ह्यात लस मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तरी देखील नागरिकांनी दुसर्‍या डोसकरिता पाठ फिरविली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची गावनिहाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरी देखील दुसर्‍या डोसबाबत नागरिकांडून दाखविण्यात येत असलेली उदासीनतेमुळे आरोग्य यंत्रणा देखील हतबल झाली आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर सुरुवातीला 28 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर तो 45 दिवसांपर्यंत वाढविण्यात आला. या कालावधीमध्ये पहिला व दुसरा डोस घेणार्‍यांची लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली. परिणाम लसीचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे पहिल्या डोसनंतर दुसर्‍या डोसचा कालावधी 84 दिवसांचा करण्यात आला.

दरम्यानच्या काळामध्ये लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने जास्तीत जास्त लसीकरण व्हावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. तरीदेखील आजअखेर पहिला डोस घेऊन 84 दिवसांचा कालावधी झाल्यानंतर 2 लाख 88 हजार 964 नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही.

दुसरा डोस न घेतलेल्यामंध्ये सर्वाधिक 42 हजार 68 नागरिक करवीर तालुक्यातील आहेत. त्या नंतर हातकणंगले तालुक्याचा नंबर लागतो. या तालुक्यातील 37 हजार 393 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.

तालुकानिहाय आकडेवारी

 

84 दिवस पूर्ण झालेल्या परंतु दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे : आजरा 12344, भुदरगड 15897, चंदगड 21082, गडहिंग्लज 23856, गगनबावडा 5766, हातकणंगले 37393, कागल 22881, करवीर 42068, पन्हाळा 25984, राधानगरी 24212, शाहूवाडी 22947, शिरोळ 43535.

Back to top button