खराब रस्त्यांमुळे कोल्हापुरातील प्रदूषणात वाढ | पुढारी

खराब रस्त्यांमुळे कोल्हापुरातील प्रदूषणात वाढ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूरला प्रदूषणाचे अक्षरश: ग्रहण लागले आहे. वाहनांची वाढती संख्या, झाडांची प्रचंड कत्तल, औद्योगिकरणामुळे दिवसागणिक शहराभोवती प्रदूषणाचा विळखा घट्टच होत चालला आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे एकूण प्रदूषणापैकी (पीएम 2.5 व 10) तब्बल 22 टक्के प्रदूषण हे केवळ आणि केवळ शहरातील खराब रस्त्यांमुळे होत असल्याचे एमपीसीबीच्या अहवालातून समोर आले आहे.

औद्योगिक कंपन्यांनंतर शहरातील प्रदूषणवाढीस जबादार असणार्‍या घटकांमध्ये खराब रस्ते व रसत्यांवरील धुळीचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अहवालानुसार एकूण पीएम (पर्टिक्युलेट मॅटर 2.5 व 10) उत्सर्जनामध्ये याचा 22 टक्क्यांचा वाटा असल्याचे सांगण्यात आले आहे.

यामुळे महापालिकेच्या वतीने 2022 पर्यंत शहरातील कच्च्या रस्त्यांमधून होणारे प्रदूषण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या प्रत्येक वाहनामुळे धूळ उडताना दिसून येते.

या रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती न करता अनेक ठिकाणी केवळ निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क केले आहे. यामुळे सर्वत्र धुळीचे लोट दिसत आहेत. सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे अ‍ॅलर्जी, तसेच श्वसनाच्या विकारांचा धोका उद्भवू शकतो, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

शहरात धूलिकणांनी ओलांडली धोक्याची पातळी

खराब रस्ते, रस्त्यांवरील धूळ, सुरू असलेली बांधकामे, वाहनांची वर्दळ यामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. एमपीसीबीच्या अहवालानुसार ऑगस्ट महिन्यात दाभोळकर कॉर्नर परिसरात सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटरचे (एसपीएम) सर्वाधिक प्रमाण 215, तर महाद्वार रोड परिसरात 160 मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर होते. शहरातील हे प्रमाण चिंता वाढवणारे आहे.

धूलिकण शरीरासाठी अत्यंत घातक

पर्टिक्युलेट मॅटर (पीएम) अर्थात हवेतील अती सूक्ष्म धूलिकण. हे कण श्वसनावाटे फुप्फुसात जातात व तेथून रक्तात मिसळण्याचा धोका असतो. याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आयुर्मानावरदेखील होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने वाढत्या पीएमबद्दल (2.5 व 10) चिंता व्यक्त केली आहे.

कोल्हापुरातील एकूण पीएम उत्सर्जन

औद्योगिक क्षेत्र – 32 टक्के रस्त्यांवरील धूळ – 22 टक्के
बांधकाम – 13 टक्के वाहने – 12 टक्के दगडी खाणी – 11 टक्के स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन – 10 टक्के खुल्यावर पेटवल्या जाणार्‍या वस्तू -0.15 टक्के.

शहरातील खराब रस्त्यांमुळे हवेतील अती सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी ग्रीन बेल्ट विकसित करणे गरजेचे आहे.
– अनिल चौगुले, पर्यावरण अभ्यासक

Back to top button