पाक आणि चीनवर आता ‘आयएनएस वेला’ची नजर | पुढारी

पाक आणि चीनवर आता ‘आयएनएस वेला’ची नजर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट-75 अंतर्गत सहा पाणबुड्यांपैकी चौथी ’आयएनएस वेला’ ही पाणबुडी गुरुवारी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांच्या हस्ते ही पाणबुडी नौदलास सुपूर्द करण्यात आली. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे हा औपचारिक सोहळा पार पडला.

फ्रान्सच्या मे. नेव्हल ग्रुपच्या (पूर्वीची डीसीएनएस) सहकार्याने मुंबईतल्या माझगाव डॉक शिपयार्डसमध्ये स्कॉर्पिन श्रेणीतील ही पाणबुडी बांधण्यात आली. नौदलाच्या ताफ्यात आयएनएस वेलाच्या रुपात स्कॉर्पियन प्रकारातील ही चौथी पाणबुडी सामील करण्यात आली आहे. आयएनएस वेला ही पश्चिम नौदल कमांडच्या पाणबुडीच्या ताफ्याचा भाग असेल आणि शस्त्रागाराचा आणखी एक शक्तिशाली भाग असेल.

खासदार अरविंद सावंत, पश्चिमी नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हॉईस अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार, माझगाव जहाजबांधणी गोदीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हॉईस अ‍ॅडमिरल (निवृत्त) नारायण प्रसाद यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.

‘आयएनएस वेला’ची वैशिष्ट्ये

स्कॉर्पिन पाणबुड्या अत्यंत शक्तिशाली असून त्यात प्रगत स्टेल्थ (गुप्त) वैशिष्ट्ये आहेत.
लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित पाणसुरूंग तसेच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी या पाणबुड्या सुसज्ज आहेत.
या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक ’सोनार’ आणि सेन्सर संच असल्याने त्यांच्यात उत्कृष्ट कार्यान्वयन क्षमता असते.
त्यांच्याकडे प्रॉपल्शन मोटर म्हणून प्रगत पर्मनंट मॅग्नेटिक सिंक्रोनस मोटर देखील आहे.

Back to top button