मंगळावरील सूर्यास्त : सूर्यास्ताची काही छायाचित्रे प्रसिद्ध - पुढारी

मंगळावरील सूर्यास्त : सूर्यास्ताची काही छायाचित्रे प्रसिद्ध

न्यूयॉर्क : पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्राशिवाय मानवाला सर्वाधिक आकर्षण जर कोणत्या खगोलाचे वाटत असेल तर तो म्हणजे शेजारचा मंगळ ग्रह. या लाल ग्रहावर अनेक देशांनी आपापली अंतराळयाने सोडलेली आहेत. प्रत्यक्ष मंगळभूमीवरही आजपर्यंत अनेक रोव्हर्स फिरत असून आता तर एक रोव्हरक्राफ्टही तेथील आसमंतात फिरत आहे. पृथ्वीवर सूर्यास्त पाहण्यासाठी अनेक पर्यटनस्थळी खास पॉईंट असतात. अशावेळी मंगळावरील सूर्यास्त कसा दिसतो याची अनेकांना उत्सुकता असू शकते. आता ‘नासा’ने तेथील सूर्यास्ताची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

‘नासा’ने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तेथील सूर्यास्ताचे छायाचित्र शेअर केले आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की ‘लाल ग्रहावरचा एक निळा सूर्यास्त. आमच्या पर्सिव्हरन्स मार्स रोव्हरने पहिल्यांदाच मंगळावरील सूर्यास्ताचे छायाचित्र टिपले आहे.

हे छायाचित्र 9 नोव्हेंबरला टिपण्यात आले असून त्यासाठी मास्टकॅम-झेड या कॅमेरा सिस्टीमचा वापर करण्यात आला. अर्थात सर्वसामान्यांना आता असा सूर्यास्त पाहायला मिळत असला तरी 1970 च्या दशकापासूनच ‘नासा’ मंगळावरील सूर्यास्ताचे अवलोकन करीत आली आहे. पर्सिव्हरन्स रोव्हरने आपल्या मोहिमेच्या 257 व्या दिवशी हे छायाचित्र टिपले आहे.

पृथ्वीवरील वातावरण विविध वायूंनी बनलेले आहे. त्यामुळे आपल्याकडे एरव्ही निळसर दिसणारे आकाश सूर्यास्तावेळी सोनेरी, लाल-गुलाबी दिसते. मंगळावरील वातावरण पृथ्वीपेक्षा वेगळे असल्याने तेथील धुळीमुळे आकाश एका विशिष्ट निळ्या रंगाचे दिसते असेही ‘नासा’ने म्हटले आहे.

Back to top button