येथील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) कोल्हापुरी चप्पल, सांगलीची हळद आणि बेदाण्यांसह महाराष्ट्रातील लघुउद्योजकांच्या स्टॉल्सवरील वस्तूंना देश-विदेशातील ग्राहकांची खास पसंती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
मसाले, चामड्यांची उत्पादने, बांबू फर्निचर, पैठणी साड्या आदींसह विविध वस्तूंकडे ग्राहक आकर्षित होत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगती मैदान येथील हॉल क्र. 2 मध्ये राज्याचे विद्युत वाहन धोरण, राज्यातील महत्वाचे प्रकल्प, स्टार्टअपची विविध उत्पादने आणि हस्तकला उत्पादनांनी सुसज्ज व सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेच्यावतीने (इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन) 40 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आयोजित केला आहे. राज्य शासनाच्या पुढाकारातून देश-विदेशात सांगलीची उत्पादने
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या वांगी येथील लालासो भोसले यांचा हळद, बेदाणा आणि मिरचीपूड ही उत्पादने असलेल्या स्टॉलवर ग्राहकांची एकच गर्दी दिसते.
रास्त दरात गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळत असल्याचा आनंद या स्टॉलहून उत्पादने खरेदी करणार्या ग्राहकांनी बोलून दाखवला. या स्टॉलचे प्रमुख लालासो भोसले गेल्या चार वर्षांपासून या मेळाव्यात येताहेत व राज्यशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीमुळे देश-विदेशातील ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहचत असल्याचे समाधान त्यांनी बोलून दाखविले.
माविमच्या 'क्रांतीज्योती वारली पेंटींग युनिट'चा वारली बॅग आणि गारमेंटच्या स्टॉलवरील आकर्षक उत्पादनेही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. वारली पेंटींग युनीटच्या रीना जाधव आणि शमसुन्नीसा इकबाल खुटे यांच्या चेहर्यावरील आनंदही बोलका आहे. चंद्रपूर येथील कार्पेट क्लस्टरचा स्टॉल व येथील कार्पेट वॉल फ्रेमिंग, बांबुकव्हर डायरीही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.
आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेंतर्गत येथे गडचिरोली जिल्हयातील मोशीखांब येथील प्रतिक्षा हॅण्डीक्रॉफ्टचा स्टॉल आहे, या स्टॉलच्या प्रमुख प्रतिक्षा शिडाम यांनी कुशन कव्हर,लाईट लँप, मॅक्रम, वारली पेंटींग जाकेट आदि उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. खादी ग्रामोद्योग महामंडळांशी संलग्न औरंगाबाद येथील शुभम लेदर अँड लेदर फोम इंडस्ट्रीनेही चामड्याची आकर्षक उत्पादने विक्रीस ठेवली आहेत. या स्टॉलचे प्रमुख गजानन पुरुषोत्तम हे 2008 पासून खादी ग्रामोद्योग महामंडळासोबत काम करीत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील 'वुडीग्रास' हा बांबू फर्निचरचा स्टॉलही महाराष्ट्र दालनास भेट देणार्या ग्राहक व व्यापार्यांचे लक्ष वेधून घेत आहे. वुडीग्रास हा उपक्रम सुरु होवून केवळ एक महिना झाला असून अल्पावधीतच त्यास या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात आपले उत्पादन प्रदर्शित विक्री करण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
राज्यातील आठ उद्योग समूहांची (क्लस्टर) उत्पादने येथील स्टॉलवर प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवली आहेत. महाराष्ट्र दालनात राज्य शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या विद्युत वाहन धोरण, विविध स्टार्टअप, औरंगाबाद औद्योगिक शहर, कोस्टल रोड प्रकल्पाची माहिती देणारे आकर्षक स्टॉल्स उभारले आहेत.
बृहन्मुंबई महापालिका, औरंगाबाद औद्योगिक शहराविषयी माहिती देणारा आकर्षक स्टॉल, महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य केंद्रही (मैत्री) या दालनास भेट देणार्या व्यापार व उद्योग क्षेत्रातील मंडळींना आकर्षित करीत आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व उमेदच्या बचतगटांच्या स्टॉलवर कोल्हापुरी चपलांसह विक्रीसाठी असलेली वैशिष्ट्यूपर्ण पादत्राणे, वारली पेंटिंग्ज ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. कोल्हापूर येथील सिध्दाई महिला बचतगटाच्या ङ्गआम्ही कोल्हापुरी चप्पलफ या स्टॉलवर कोल्हापुरी चप्पलच्या कापशी, कुरुंदवाडी, शाहू चप्पल, पेपर कापशी आदींची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. सिध्दाई महिला बचतगटाच्या प्रमुख सीमा कांबळे यांनी सांगितले की, 2016 पासूनच राज्य शासनाच्या उमेद अभियानासोबत मी जोडले आहे. भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात पहिल्यांदाच सहभागी झाले आहे. जागतिक दर्जाच्या या मेळाव्यामुळे चोखंदळ ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहचत असल्याचे समाधान मिळत आहे.