सूर्यकिरणांचा चरणस्पर्श | पुढारी

सूर्यकिरणांचा चरणस्पर्श

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सूर्याच्या उत्तरायणातील किरणोत्सवामध्ये मंगळवारी सूर्यकिरणांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचा चरणस्पर्श केला. 6 वाजून 15 मिनिटे ते 6 वाजून 17 मिनिटे सूर्यकिरणे देवीच्या चरणावर स्थिरावली होती. किरणांची तीव्रता कमी होत गेल्याने अपेक्षित किरणोत्सव होऊ शकला नाही. तरीही भाविकांमध्ये किरणोत्सवाचा सोहळा पाहण्याचा उत्साह दिसून आला.

29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान उत्तरायणातील किरणोत्सव सुरू आहे. मंगळवारी दुसर्‍या दिवशी सूर्यकिरणांनी अंबाबाईचे चरणस्पर्श केले. गतवर्षी दुसर्‍या दिवशी किरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली होती. मंगळवारी कासव चौकापर्यंत सूर्यकिरणांची तीव्रता अपेक्षेप्रमाणे होती. मात्र, नंतर हळूहळू किरणांची तीव्रता घटली. अखेरच्या टप्प्यात ढगांचा अडथळा आला.

सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी किरणोत्सवाला सुरुवात झाली. 5 वाजून 53 मिनिटांनी गणपती मंदिरच्या पाठीमागे, 6 वाजून 9 मिनिटांनी चांदीच्या उंबर्‍याजवळ आली. यानंतर किरणांनी देवीच्या गर्भकुटीच्या संगमरवरी पायर्‍यांवरून कटांजनापर्यंत आली. 6 वाजून 15 मिनिटे ते 6 वाजून 17 मिनिटांपर्यंत सूर्यकिरणे देवीचा चरणस्पर्श करून किंचित वरच्या बाजूला जाऊन लुप्त झाली. यानंतर भाविकांनी देवीच्या नावाचा जयघोष केला. किरणोत्सवावेळी किरणोत्सव अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र अभ्यासक गणेश नेर्लेकर आदी उपस्थित होते.

Back to top button