Ram Mandir : हुपरीत अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती | पुढारी

Ram Mandir : हुपरीत अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती

हुपरी; अमजद नदाफ : संपूर्ण जगात सध्या अयोध्या येथील श्री राम मंदिराची चर्चा आहे. तेथील धार्मीक कार्यक्रमाविषयी सर्वांनाच आतुरता आहे. आयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराची हुबेहूब  प्रतिकृती हुपरी येथे उभारण्यात आली आहे. लाकडापासून बनवलेली ही प्रतिकृती कोल्हापूरसह ३०० गावांत मार्गक्रमण करणार आहे. २५० किलोमीटर प्रवास होणार असून भक्तांना याच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे.

संबंधित बातम्या : 

व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाबा घोरपडे यांच्या माध्यमातून व डॉक्टर संगीता निंबाळकर यांच्या संकल्पनेतून आयोध्यातील श्रीराम प्रभू यांच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही प्रतिकृती हुपरी तालुका हातकंणगले येथील शामराव संतू लोहार यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी तयार केली आहे. २० दिवसाच्या अथक प्रयत्नातून ही प्रतिकृती बनलेली आहे. या मंदिराकडे पाहताना अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन झाल्याचा अनुभव येतो.

हे मंदिर तयार करण्यासाठी लोहार कुटुंबियांना कळे येथील सुरेश पांडूरंग लोहार सुतार यांनी सहकार्य केले. मंदिराची थ्रीडी कॉपी अवधूत व अनिकेत सुतार यांनी तयार केली. या थ्रीडी कॉपीला वास्तवात उतरवण्याचे काम हुपरी गावचे हिंदुराव लोहार, प्रशांत लोहार आकाश सुतार, अमित लोहार, तुकाराम गिरी, जयदेव सुतार, रुपेश लोहार, प्रमोद लोहार, यांनी केले. तसेच रामदास म्हेत्तर, रावसाहेब म्हेत्तर, जयवंत मोरे, संभाजी माळी आदींनी सहकार्य केले. हे मंदिर हुपरीतील गिरी बुवा माळी वसाहत येथे तयार करण्यात आले आहे. मंदिरात श्री राम यांच्या मूर्तीची  प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी नारायण चौक गिरी माळी वसाहत मधील नागरिकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यानंतर हे मंदिर हुपरीतून कोल्हापूरला रवाना झाले. या मंदिर रथाचा करवीर, पन्हाळा, कोल्हापूर, असा २०० ते २५० किलोमीटर प्रवास होणार असून ३०० ते ३५० गावांच्या लोकांना मंदिराच्या दर्शनाचा लाभ होणार आहे.

मंदिराची २१ जानेवारी रोजी सायबर चौक ते दसरा चौक अशी भव्य मिरवणूक होणार आहे. २२ तारखेला दसरा चौकात दर्शनासाठी विराजमान करण्यात येणार आहे. जे भाविक अयोध्या येथे जाऊ शकत नाहीत ते ही प्रतिकृती पाहून धन्यता मानत आहेत. हुपरी मधील लोहार कुटुंबीयांनी अथक प्रयत्नांनी मंदिर उभारले आहे. त्याचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे हुपरी शहराच्या वैभवात भर पडली आहे.

हेही वाचा :

Back to top button