विरोधकांचा मोर्चा केवळ कारखान्याच्या बदनामीसाठी : अमल महाडिक | पुढारी

विरोधकांचा मोर्चा केवळ कारखान्याच्या बदनामीसाठी : अमल महाडिक

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : राजाराम कारखान्याकडून ऊसतोड वेळेत दिली जात नसल्याचा आरोप करत काही लोकांनी आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयावर मोर्चा काढला. राजाराम कारखान्याला बदनाम करण्यासाठी, हा मोर्चा काढल्याची टीका माजी आमदार व कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन, अवकाळी पाऊस, मराठा आंदोलन अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचे तोडणी वेळापत्रक बिघडले आहे; पण केवळ राजाराम कारखान्याबद्दल मत्सरातून हा मोर्चा विरोधकांनी काढला. त्यांच्या मोर्चात शेतकरी कमी आणि कार्यकर्तेच जास्त होते. कारखान्याचे एकूण 15 हजार सभासद संख्या आहे. यापैकी फक्त 150 लोक मोर्चाला उपस्थित होते. त्यातही पंचवीसभर सभासद वगळता इतर सर्व कार्यकर्तेच सामील होते. मूळ सभासदांचा कारखाना प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे.

पत्रकार परिषदेला राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, तानाजी पाटील, संतोष पाटील, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

…तर डी. वाय. पाटील कारखान्यावर मोर्चा काढू

मोर्चाला उपस्थित 20 ते 25 सभासदांपैकीही बर्‍याच लोकांचा ऊस कारखान्याने नेला असून खात्यावर पैसेही जमा झाले आहेत. केवळ कारखान्याच्या बदनामीच्या हेतूने कोणी प्रशासनास धारेवर धरण्याचा प्रयत्न करत असेल, तर जशास तसे उत्तर देऊ. वेळप्रसंगी जिथे खासगीकरण झाले त्या डी. वाय. पाटील कारखान्यावर मोर्चा काढू, असा इशारा महाडिक यांनी दिला.

Back to top button