महाडिक-मुश्रीफ यांची बुलेटसवारी | पुढारी

महाडिक-मुश्रीफ यांची बुलेटसवारी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी पोलिस मैदानावर केलेली बुलेटची सवारी जिल्ह्याच्या राजकारणात सोमवारी चर्चेची ठरली. बुलेटचे सारथ्य महाडिक यांनी केले. मुश्रीफ-महाडिक यांनी बुलेटवरून मारलेल्या फेरीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात याची चर्चा सुरू झाली आहे.

मुश्रीफ व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांची जोडी जिल्ह्याच्या राजकारणात सर्वश्रुत आहे. दोघेही एका आघाडीत होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपला पाठिंबा दिला. पवार यांच्यासोबत जे आमदार गेले, त्यामध्ये मुश्रीफ होते. मुश्रीफ यांना पुन्हा मंत्रिपद मिळाल्यानंतर पूर्वी त्यांच्यासोबत असणारे काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते बाजूला गेले.

महायुतीतील भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत मुश्रीफ कार्यक्रमांमध्ये अधिक दिसू लागले. सोमवारी पोलिस दलाला नवीन वाहने हस्तांतराचा कार्यक्रम हसन मुश्रीफ व धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी महाडिक यांनी बुलेटवरून मुश्रीफ यांच्यासोबत फेरी मारली. त्यामुळे सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Back to top button