जयसिंगपूर : हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत वर्चस्वासाठी ‘भानामती’ | पुढारी

जयसिंगपूर : हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत वर्चस्वासाठी ‘भानामती’

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : शिरोळ येथे हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत आपलेच वर्चस्व राहावे, याकरिता विरोधी संघांच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून त्या चिठ्ठ्या ठेवून भानामती करण्याच्या अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार रविवारी शिरोळ स्मशानभूमीत समोर आला. येथील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांनी साहित्य काढून तो परिसर स्वच्छ केला.

अज्ञात व्यक्तीने हळद-कुंकू, सुपारी, अन्य साहित्य, काळ्या बाहुल्या आणि विविध क्रिकेट संघांच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून त्या स्मशानभूमीत पुजल्या असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या दोन दिवसांपासून घडत आहे. दरम्यान, रविवारी रक्षाविसर्जनासाठी उपस्थित असणारे डी. आर. पाटील, चंद्रकांत भाट, उल्हास पाटील यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांना दिली.

हेरवाडे यांनी तत्काळ स्मशानभूमीत येऊन करणी व भानामतीसाठी वापरलेले साहित्य स्वतः बाजूला केले. त्या ठिकाणी काळ्या बाहुलीच्या पोटात खुपसलेल्या चिठ्ठ्या काढून उघडून पाहिल्या असता त्या ठिकाणी चार चिठ्ठ्यांमध्ये हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत सहभागी असणार्‍या क्रिकेट संघांची व खेळाडूंची नावे मिळून आली. त्यामुळे क्रिकेट स्पर्धेतील वर्चस्वासाठी हा प्रकार अज्ञातांनी केल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी खंडेराव हेरवाडे म्हणाले की, अंधश्रद्धेपोटी असे प्रकार घडत असतात. यामुळे समाजात भीती निर्माण होते, असे करून काही साध्य झाले असते; तर जगावरही राज्य करता आले असते; पण करणी व भानामतीने कोणावरही विपरीत परिणाम होत नाही, यामुळे अशा प्रकाराबाबत कोणीही घाबरून जाऊ नये.

Back to top button