Kolhapur accident news : वारणा उजव्या कालव्यात दुचाकी कोसळून युवक ठार | पुढारी

Kolhapur accident news : वारणा उजव्या कालव्यात दुचाकी कोसळून युवक ठार

कोडोली, पुढारी वृत्तसेवा : भरधाव दुचाकीवरून देवाळे गावाकडे जात असताना कोडोली-पोखले रस्त्यावरील 50 फूट खोल वारणा उजव्या कालव्यात दुचाकी कोसळून झालेल्या अपघातात सूरज रमेश जाधव (वय 23, रा. देवाळे, ता. पन्हाळा) हा युवक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

सूरज जाधव हा आरळे येथील मित्र किरण शिनगारे याच्याबरोबर पोखले येथे देवदर्शनासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने सूरजला त्याचा भाऊ धीरजने फोन करून तातडीने घरी येण्यास सांगितले. त्यानंतर सूरज दुचाकीवरून भरधाव वेगाने देवाळे गावी जात असताना कोडोली-पोखले रस्त्यावरील नागमोडी वळणावर त्याचा ताबा सुटला आणि रस्त्याला संरक्षण कठडे नसल्याने मातीच्या ढिगार्‍यावरून 50 फूट खोल वारणा उजव्या कालव्यात दुचाकीसह कोसळला. मोठ्या दगडावर सूरज आपटल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, सूरज घरी परत न आल्याने बुधवारी सकाळी तो बेपत्ता झाल्याची फिर्याद कोडोली पोलिस ठाण्यात देण्यास आलेल्या नातेवाईकांना दुचाकीसह एकजण उजव्या कालव्यामध्ये पडल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असता सूरजचा मृतदेह त्यांच्या निदर्शनास आला. या घटनेची माहिती समजताच देवाळे गावच्या लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.सूरज हा इलेक्ट्रिक लाईट फिटिंगचा व्यवसाय करत होता. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड करीत आहेत.

Back to top button