बाळूमामांची बकरी भुजवणे कार्यक्रम उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती | पुढारी

बाळूमामांची बकरी भुजवणे कार्यक्रम उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती

मुदाळतिट्टा; प्रा. शाम पाटील : बाळूमामाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात श्रीक्षेत्र आदमापुर ता. भुदरगड येथे दीपावली ‌पाडव्या दिवशी बाळुमामाच्या बकरी पूजनाचा व भुजवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बाळूमामांनी सुरू केलेल्या बकरी पूजन व बकरी भुजवणे या कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातून हजारो भाविक उपस्थित होते.

प्रारंभी बाळूमामा मंदिरातून देवस्थानचे मानकरी राजनंदीनी धैर्यशीलराजे भोसले यांच्याहस्ते ढोल, कैताळाच्या वाद्यात भंडारा आणण्यात आला. मरगुबाई मंदिर परिसरात बाळूमामांच्या बकऱ्यांची लेंढ्याची रास करण्यात आली. या राशीचे विधिवत पूजन करण्यात आले. विविध प्रकारच्या फुलांनी रास सजवण्यात आली होती. सभोवती गवळण्या घालण्यात आल्या होत्या. बाळूमामांच्या कळपातील प्रातिनिधिक स्वरूपात भुजवण्यासाठी (पळवणे) बकरीआणण्यात आली. सुवासिनींनी बकऱ्यांचे पूजन केले.

बाळूमामांच्या भंडाऱ्याची राशीवर उधळण करण्यात आली. यावेळी दूध ऊतू जाण्याच्या कार्यक्रमाकडे सगळ्या भाविकांच्या नजरा लागून राहील्या होत्या. ही प्रथा बाळूमामांनी सुरू केली होती. ज्या दिशेला हे दूध उतू जाईल त्या दिशेला पाऊस पीकपाणी उत्तम राहते, अशी भावना लोकांमध्ये आहे. यावर्षी पश्चिम बाजूला दूध बाहेर गेल्याने हा भाग सुजलाम सुफलाम होणार हे भाकित या प्रथेतून सांगण्यात आले. या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विविध जाती धर्मातील भक्तांनी आणलेला दिवाळीचा फराळ भक्तांना वाटप करण्यात आला. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारा आदमापुरची दिवाळी पाडवा यात्रा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास राजनंदिनी धैर्यशील राजेभोसले, शिवराज नाईकवडे, नागाप्पा मिरजे, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे आदी उपस्थित होते.

Back to top button