मधुमेहाचा विळखा होतोय घट्ट! | पुढारी

मधुमेहाचा विळखा होतोय घट्ट!

कोल्हापूर (पुढारी वृत्तसेवा) : देशात मधुमेह रुग्णांची संख्या वाढत असून हा विळखा अधिक घट्ट होत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. एक हजार रुग्णांमध्ये 10 रुग्ण मधुमेहाचे आढळतात. 30 वयोगटाच्या पुढे जिल्ह्याची लोकसंख्या साडेबारा लाख आहे. यामध्ये 13 टक्के रुग्ण मधुमेहाचे आहेत. मधुमेहाच्या औषधांवर महिन्याला कोट्यवधींचा खर्च होतोे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात वेटिंग असल्याचे मधुमेह तज्ज्ञांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

गर्भावस्थेतील मधुमेह काय?

गर्भावस्थेत शरीरातील ग्रंथीमध्ये बदल होतात. अशावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास महिलांना मधुमेहाचा सामना करावा लागतो. गर्भावस्थेतील 24 ते 28 व्या आठवड्यात याचा धोका अधिक असतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मधुमेह टाईप एक, टाईप दोन म्हणजे काय?

आनुवंशिकता, बदलती जीवनशैली यामुळे टाईप 1 मधुमेह प्रामुख्याने लहान मुलांसह तरुणांमध्ये आढळतो. टाईप 2 मध्ये स्थूलतेमुळे शरीरातील इन्सुलिनच्या क्षमतेला अवरोध निर्माण होतो. परिणामी रक्तातील साखर वाढत राहते. या प्रकारचा मधुमेह तरुणांमध्ये वाढत आहे. याला मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा अभाव व जीवनशैली होय.

90 टक्के रुग्ण टाईप 2 चे

भारतात मधुमेह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे टाईप 2 मधुमेहाचे रुग्ण आहेत. वय वाढेल तसे टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता असते.

ग्रामीण रुग्णालयांमध्ये असंसर्गजन्य रोग कक्ष

राज्याच्या आरोग्य विभागाने मधुमेही रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सेवा रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये असंसर्गजन्य रोग कक्षाची स्थापन केला आहे. येथे रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार देऊन समुपदेशन केले जात आहे.

लहान मुलांसह तरुणांमध्ये मधुमेह

लहान मुले, तरुणांमधील मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आनुवंशिकता, बदलती जीवनशैली याला विशेष कारणीभूत आहे. मुलांमध्ये टाईप एक मधुमेहाचे प्रमाण वाढल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

मधुमेह कसा ओळखतात

मधुमेह झालेल्या मुलाची तहान वाढते. वारंवार लघवीला येते, डोळ्यांवर झापड येऊन झोप येते, सतत थकवा आणि आळस वाढतो, द़ृष्टी अंधुक होते… अशी लक्षणे असतील तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरू ठेवणे महत्त्वाचे असते.

Back to top button