इचलकरंजीत 11 बनावट नोटा भरणा केल्याचा आणखी एक प्रकार | पुढारी

इचलकरंजीत 11 बनावट नोटा भरणा केल्याचा आणखी एक प्रकार

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरात आणखी एका बँकेच्या कॅश डिपॉझिटमध्ये 100 रुपयांच्या 11 बनावट नोटांचा भरणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दिनेश तानाजी लोहार (रा. लिंबू चौक) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फेडरल बँक येथे 17 बनावट नोटा भरल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलिस उपनिरीक्षक भागवत मुळीक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांतील संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

फेडरल बँकेच्या डिपॉझिट मशिनमध्ये 17 बनावट नोटा भरल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी प्रशांत मारुती पाटील (रा. डेक्कन चौक) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. त्यातच आज आणखीन एक प्रकार समोर आला.

कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिनेश तानाजी लोहार या संशयीताचे खाते आहे. या खात्यात त्याने 14 ऑक्टोबर रोजी 100 रुपयांच्या 64 नोटा असे 6 हजार 400 रुपये भरले होते. त्यामध्ये 11 बनावट नोटा असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. याबाबतची फिर्याद नोडल ऑफिसर आण्णासो मलगोंडा नेर्ले (रा.अब्दुललाट) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. या दोन्ही प्रकरणातील दोघाही संशयीतांकडून पोलिसांनी 28 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्या तपासणीसाठी नाशिक येथे पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button