Kolhapur monsoon changing : कोल्हापूरचा मान्सून पॅटर्न बदलतोय | पुढारी

Kolhapur monsoon changing : कोल्हापूरचा मान्सून पॅटर्न बदलतोय

आशिष शिंदे

कोल्हापूर : कोल्हापूरच्या आकाशात घोंघावणार्‍या ढगांचा वेग आणि वार्‍याच्या दिशेमध्ये सातत्याने बदल होत आहेत. केंद्र सरकारच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझमच्या संशोधनातून 2016 ते 2020 या कालावधीत मार्च ते मे महिन्यात हा बदल दिसून आला. त्याचा आघात कोल्हापूरच्या मान्सूनपूर्व पावसावर तसेच मान्सूनच्या पॅटर्नवर झाल्याचे उघड झाले आहे.

ढगांचे आवरण सूर्यापासून येणार्‍या घातक अतिनील सौरकिरणांची तीव्रता कमी करतात. पृथ्वीच्या बाहेर जाणार्‍या लाँग वेव्ह रेडिएशनसाठी ब्लँकेटसारखे काम हे ढग करतात. यामुळे ढगांचा पृथ्वीवरील हवामानात महत्त्वाचा वाटा आहे. ढगांच्या हालचालींमध्ये झालेला बदल प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या थेट पृथ्वीवरील हवामानावर परिणाम करत असतो. हा परिणाम ढगांचे स्पेस-टाइम डिस्ट्रिब्युशन, ढगांची उंची, जाडी, आकार आणि वितरणावर अवलंबून असतो.

उपग्रहांमधील सेन्सर्स ढगांच्या हालचाली टिपतात. त्यावरून ढग वार्‍यांसह पुढे सरकतात हे लक्षात येते. या गृहितकानुसार आणि क्लाऊड मोशन वेक्टरची मूल्ये वायुमंडलीय गतिशीलता आणि त्याचा प्रवास समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

ढगांच्या अभ्यासासाठी कोल्हापूर उपयुक्त

ढगांच्या अभ्यासासाठीच्या द़ृष्टीने कोल्हापूर हे कमी उंचीच्या क्षेत्रात असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील संशोधनासाठी रात्री आकाशात असलेल्या ढगांचा ट्रेसिंगसाठी ऑल स्काय इमेजरचा वापर करण्यात येतो. त्याचाच उपयोग करुन शास्त्रज्ञांनी रात्रीच्या ढगाळ वातावरणाचा डेटा संकलित केला. आकाशातील ढगाळ वातावरणाचा डाटा एअरग्लो अभ्यासासाठी इतरवेळी अप्रासंगिक मानला जातो. मात्र कमी उंचीच्या क्षेत्रातील प्रयोगासाठी याच डेटाचा केलेला उपयोग ही या संशोधनाची खासियत आहे.

एसआय व इनसॅट सॅटेलाईट डेटाचा वापर

ऑल स्काय इमेजरमध्ये (एसआय) उच्च अवकाशीय रिझोल्युशनचा वापर करण्यात येतो. यामुळे शास्त्रज्ञांना 10 किलोमीटरपर्यंतच्या रिझोल्युशनच्या इनसॅट सॅटेलाईट डेटाशी तुलना करणे शक्य झाले. त्यानुसार 2016 ते 2020 या कालावधीत मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत एअरग्लो मॉनिटरिंगसाठी हा डेटा गोळा करण्यात आला. त्याद्वारे संशोधकांनी ढगांच्या स्थितीचा अभ्यास केला. त्यानुसार 2017 मध्ये ढगांची गती सर्वात कमी दिसून आली. तर इतर वर्षांमध्ये ती 2017 च्या तुलनेत जास्त होती. या कालावधीत ढग नैऋत्य-पश्चिम दिशेला वळताना आढळले.

Back to top button