क्रिकेट मैदानावरच खेळाडूचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू | पुढारी

क्रिकेट मैदानावरच खेळाडूचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

पेठवडगाव : पुढारी वृत्तसेवा : संघाच्या विजयासाठी धावांची बरसात सुरू होती. त्याने अर्धशतक करून संघाला विजयी केले. संयोजकांनी त्याला ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्कार बहाल केला. विजेत्या संघाने एकच जल्लोष केला; पण काही क्षणात या सामनावीराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

अमर पांडुरंग साबळे (वय 32, रा. अंबपवाडी ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. अंबप (ता. हातकणंगले) येथे सोमवारी दुपारी अंबप प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेवेळी ही घटना घडली. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या चार दिवसांपासून अंबप स्पोर्टस् व अशोकराव माने ग्रुपच्या वतीने अंबप प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. आज राजमंगल स्पोर्टस् विरुद्ध जय मल्हार स्पोर्टस् यांच्यात सामना सुरू होता. अमर साबळे हा राजमंगलकडून खेळत होता. त्याने गोलंदाजी करून 3 विकेट घेऊन संघाला विजयी केले.

उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणून अमरला ‘मॅन ऑफ दी मॅच’चा पुरस्कार दिला. संघाकडून विजयाचा एकच जल्लोष सुरू असताना अचानक अमर मैदानावर कोसळला. यातच त्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. सायंकाळी मृतदेह अंबपवाडी येथील घरी आणण्यात आणल्यानंतर नातेवाईकांसह मित्रांनी फोडलेल्या टाहोने उपस्थितांची मने हेलावून गेली. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार आहे.

मित्रांना शोक अनावर

‘मॅन ऑफ दी मॅच’चा पुरस्कार पटकावून देणार्‍या अमरला ज्या मित्रांनी खांद्यावरून घेऊन जल्लोष केला, त्या मित्रांवरच त्याचा मृतदेह उचलण्याची वेळ आल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले. अमरच्या लग्नाचा वाढदिवस चार दिवसांपूर्वी मोठ्या थाटात झाला होता. मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने अमरचा मित्रपरिवारही मोठा होता. त्यामुळे अमरच्या जाण्याने कुटुंबासह अनेकांना धक्का बसला आहे.

हेही वाचा : 

Back to top button