हॉटेल मधील पदार्थांच्या किमती ३० टक्क्यांनी महागणार | पुढारी

हॉटेल मधील पदार्थांच्या किमती ३० टक्क्यांनी महागणार

मुंबई ; चेतन ननावरे : पेट्रोल, डिझेल दरासह व्यावसायिक एलपीजीच्या दरात झालेली वाढ आणि खाद्यतेलांच्या किमतीतील भडका या सर्व दरवाढींचा फटका आता राज्यातील खवय्यांना बसणार आहे. कारण राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल चालकांकडून वाढलेला दैनंदिन खर्च भरून काढण्यासाठी लवकरच पदार्थांच्या किमतीत जवळपास 30 टक्के वाढ करण्यात येणार आहे.

राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल चालकांच्या आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. दैनिक पुढारीशी बोलताना शिवानंद शेट्टी म्हणाले की, व्यावसायिक वापरातील 19 किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी सिलेंडर दरात गेल्या वर्षभरात 500 रुपयांहून अधिक वाढ झालेली आहे. प्रत्येक सहा महिन्यानंतर रेस्टॉरंट चालक स्थानिक पातळीवर किमतीचा आढावा घेत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांत कोरोना आणि लॉकडाऊन कारणास्तव हा आढावा घेण्यात आला नाही. याउलट बहुतांश काळ व्यवसाय बंद असल्याने खर्चात वाढ झाली असून उत्पन्नात प्रचंड घट झालेली आहे.

म्हणूनच नुकसान भरून काढताना व्यवसायात तग धरून राहण्यासाठी पदार्थांच्या किंमतीत वाढ करण्यावाचून दुसरा पर्याय समोर नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

रेस्टॉरंट व्यवसायिक आदर्श शेट्टी दैनिक पुढारीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, एलपीजी सिलेंडर आणि पीएनजी दरात झालेल्या ऐतिहासिक दरवाढ व्यवसायिकांचे कंबरडे मोडणारी आहे. गेल्या सहा महिन्यांत केवळ तग धरून राहण्यासाठी व्यवसायिकांनी किंमती वाढवल्या नव्हत्या. मात्र पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या इंधन दरातील वाढीमुळे भाजीपाला महागला आहे. याउलट इतिहासात प्रथमच पीएनजीच्या दरात प्रति युनिट तब्बल 7 रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे जेवण तयार करण्याचा खर्च प्रचंड वाढला आहे. म्हणूनच मेनू कार्डमधील पदार्थांच्या किंमती सरासरी 20 ते 30 टक्क्यांपर्यंत महागण्याची शक्यता आहे.

तवा गरम करायला पडतात 25 रुपये

ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतर विविध पदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळी भांडी वापरली जातात. त्यामध्ये पॅन किंवा तव्याचे प्रकार आहेत. यामध्ये पदार्थ तयार करताना फक्त तवा गरम करण्यासाठी 1 ते दीड युनिट पीएनजी जळतो. याशिवाय संपूर्ण डीश तयार करेपर्यंत 3 ते साडेतीन युनिट गॅसचा वापर होतो. मुंबई महानगरात महानगर गॅस लिमिटेडने एका युनिटमागे तब्बल 7 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे एक पदार्थ तयार करताना व्यवसायिकांना तब्बल 20 ते 25 रुपये जादा मोजावे लागणार आहेत. परिणामी, पदार्थाचे भाव वाढवण्यावाचून दुसरा पर्याय समोर नसल्याचे व्यवसायिक सांगतात.

खाद्यतेल दरवाढीने महागाईला फोडणी

गेल्या काही दिवसांत खाद्यतेलांच्या किंमतीत भडका उडाल्याने मेनू कार्डमधील दरवाढीस फोडणीच मिळाली आहे. रेस्टॉरंटमधील 60 टक्के पदार्थ हे रिफाईंड ऑईलमेध्ये तयार केले जातात. त्यामुळे तळलेल्या आणि तेलाचा वापर होणार्‍या पदार्थांच्या किंमतीत वाढ करण्याची गरज व्यवसायिक व्यक्त करत आहेत.

देशपातळीवर दरवाढीस सुरुवात

कर्नाटकमधील रेस्टॉरंट आणि हॉटेल मालकांचे प्रतिनिधीत्त्व करणार्‍या कर्नाटक हॉटेल्स अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनने सर्वप्रथम दरवाढीची घोषणा केली आहे. जेवण तयार करणार्‍या गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याचे कारण पुढे करत संघटनेने सरासरी 20 टक्क्यांनी दरवाढ करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यापाठोपाठ बंगळुरुमधील रेस्टॉरंट व हॉटेल चालकांच्या संघटनेनेही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही जानेवारी महिन्यात दरवाढीची अधिकृत घोषणा होण्याआधीच व्यवसायिकांकडून दरवाढ करण्यास सुरुवात
होत आहे.

किमती वाढण्यास कारण की…

* साधारणतः एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये दिवसाला व्यवसायिक वापरातील सरासरी 2 एलपीजी सिलेंडर वापरले जातात. बड्या रेस्टॉरंटमध्ये सरासरी पाच सिलेंडरचा वापर होतो.

* गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 1 हजार 089 रुपयांना मिळणार्‍या व्यवसायिक एलपीजी सिलेंडरसाठी या महिन्यात रेस्टॉरंट चालकांना 1 हजार 683 रुपये मोजावे लागत आहेत.

* परिणामी, एका सिलेंडरमागे सुमारे 600 रुपयांची दरवाढ सोसणार्‍या रेस्टॉरंटला दिवसाला 1 हजार 200 ते 3 हजार रुपयांची झळ सोसावी लागत आहे. याचाच अर्थ महिन्याला सुमारे 35 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्चात वाढ झाल्याचे आहारचे म्हणणे आहे.

Back to top button