कोल्हापूर : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बाळूमामा मंदिरात घेतले दर्शन | पुढारी

कोल्हापूर : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बाळूमामा मंदिरात घेतले दर्शन

मुदाळतिट्टा; पुढारी वृतसेवा :

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांसह आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामाचे दर्शन घेतले. बाळूमामाच्या समाधीस्थळी नतमस्तक होत प्रतिभा पाटील यांनी आशीर्वाद घेतले.

सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजता त्यांचे मंदिरात आगमन झाले. बाळूमामा देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी देवालय समितीने त्यांच्यासह कुटुंबियांचा बाळुमामांची प्रतिमा, विजय ग्रंथ, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. उपसरपंच राजनंदिनी भोसले यांनी त्यांची साडी, खणानारळाने ओटी भरणी केली.

यावेळी देवालयाचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी बाळूमामाच्या महतीविषयी माहिती दिली. माजी राष्ट्रपती पाटील यांनी बाळुमामा विषयी सविस्तर प्रश्न विचारून माहिती घेतली. बाळूमामाच्या जन्मापासून समाधी घेईपर्यंत व त्यानंतर आजपर्यंतचा मंदिरांचा इतिहास जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी बाळूमामा समाधीचे दर्शन घेतले.

त्यांच्यासोबत त्यांचे पती देवीसिंह शेखावत, ज्योती राठोड (मुलगी), जयेश राठोड (जावई), माजी आमदार राजेंद्र शेखावत यांनी दर्शन घेतले. यावेळी आदमापुर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा व कुटुंबियाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी आडसूळ, पोलीस निरीक्षक संजय मोरे, बाळूमामा देवालय समितीचे पदाधिकारी, रावसाहेब कोणकेरी, शामराव होडगे, विजयराव गुरव उपस्थित होते. तसेच बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपसरपंच राजनंदिनी भोसले, रेखा मांगले, पोलीस पाटील माधुरी पाटील, व्यवस्थापक अशोक पाटील, एस. पी. पाटील, राजू माळी, नामदेव पाटील, दिलीप पाटील, एस. के. पाटील, गणेश खेबवडे, व्यवस्थापक अशोक पाटील, शंकरराव कुदळे, तानाजी मगदूम, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Back to top button