नितीन गडकरी म्हणाले, पालखी मार्ग विकासाचे राजमार्ग ठरतील | पुढारी

नितीन गडकरी म्हणाले, पालखी मार्ग विकासाचे राजमार्ग ठरतील

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग या दोन्ही मार्गांच्या उभारणीसाठी 12 हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. मात्र, यामुळे या मार्गावरील दळणवळण सुलभ होणार असून हे पालखी मार्ग राज्याच्या विकासाचेही राजमार्ग ठरतील, असे मत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाईन व गडकरी यांच्या थेट उपस्थितीत पार पडला. त्यावेळी येथे ते बोलत होते. यावेळी व्हीसीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, एकूण 221 किलोमीटर अंतर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गासाठी 7 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचे काम पुढील एक ते सव्वा वर्षात पूर्ण होईल, अशी आशा आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी 5 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाची लांबी 130 किलोमीटर इतकी आहे.

या पालखी महामार्गामुळे परिसरातील सर्वांगिण विकास शक्य होणार आहे.राज्य सरकार या पालखी मार्गावरील पालखी तळांच्या कामासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार 1248 कोटी खर्च करणार आहे. यामुळे वारकर्‍यांची वारी अजून सोपी होईल. .

ते म्हणाले, महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्राला जाणारे भक्तीमार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे, याचा मला सर्वाधिक आनंद होत आहे. पंढरपूर ही संतांची भूमी आहे. केवळ पंढरपूरच नव्हे तर महाराष्ट्र ही साधूसंतांची भूमी आहे. येथील साहित्य आणि कलेत संतांचे मोठे योगदान आहे. या साधूसंतांसाठी पंढरपूर हे सर्वात विशेष स्थान आहे.

तेथील भक्तांना सेवा सुविधा देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने भारतमाला योजनेतून या तिर्थ क्षेत्राचा विकास होत आहे. नितीन गडकरी म्हणाले, मानसरोवरचा मार्ग पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात तुळजापूर, शेगाव, कोल्हापूर, माहूर, शिर्डी येथील भक्तीमार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Back to top button