

भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयात काल (दि.०८) रात्री ०९ च्या सुमारास अचानक आग लागली. रुग्णालयाच्या लहान मुलांच्या वार्डला आग लागल्यामुळे चार लहान बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी याबाबत माहिती दिली आहे. शॉर्टसर्किट लागल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले. (kamla nehru hospital fire)
मंत्री सारंग यांच्या माहितीनुसार, आम्हाला घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. ही आग नवजात शिशू विभागाला लागल्याचे समजले, त्या ठिकाणी पुर्णपणे अंधार होता. तरीही आम्ही शर्थीचे प्रयत्न करून लहान बालकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, यामध्ये चार बालकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, घटनास्थळी दाखल असलेल्या एका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील एका वार्डला आग लागल्याचे समजले. ज्या विभागाला आग लागली होती तो विभाग आयसीयूचा होता. त्यामुळे क्रिटीकल परिस्थितीत उपचार घेणाऱ्या बालकांच्या वार्डला आग लागल्याने चार बालकांना जीव गमवावा लागला आहे. फतेहगढ अग्निशमन दलाचे स्टेशन प्रभारी झुबीर खान यांनी सांगितले की, आग रात्री नऊच्या सुमारास लागली आणि आग विझवण्यासाठी आठ ते दहा अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आगीची घटना अत्यंत दुःखद असल्याचे ट्वीटद्वारे सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. प्रशासनाची टीम आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या घटनेची मी माहिती घेत आहे. संबंधित अधिकारी सतत माझ्या संपर्कात आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णालय व्यवस्थापनाला मुलांची योग्य काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभागात बचावकार्य जोरात सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मोहम्मद सुलेमान या घटनेचा तपास करतील.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी आणि त्यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.