पंतप्रधान नरेंद्र मोदी: पंढरपूर हे देशातील सर्वोत्तम तीर्थक्षेत्र बनेल | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी: पंढरपूर हे देशातील सर्वोत्तम तीर्थक्षेत्र बनेल

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी महामार्गाच्या कामामुळे पंढरपूर परिसराचा विकास वेगाने होईल. उद्योग व्यवसायाबरोबर धार्मिक पर्यटनही वाढेल. यात पंढरपूरकरांचा सहभाग वाढला तर पंढरपूर देशातील स्वच्छ-सुंदर आणि सर्वोत्तम तीर्थक्षेत्र बनेल. पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला.

विठ्ठलभक्तीत भेदभाव नाही. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याची प्रेरणा विठ्ठलभक्तीतूनच मिळाली, असेही मोदी म्हणाले.
मोदी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. व्हर्च्युअल उपस्थित राहून मोदी यांनी या कामाचे उद्घाटन केले. यावेळी मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत करून उपस्थितांची मने जिंकली.

भूमिपूजन कार्यक्रमस्थळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे व्हिसीव्दारे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

भाषणाची सुरूवात मराठीतून

पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरुवात राम कृष्णहरी राम कृष्णहरी, अशी मराठीतूनच केली. शंकराचार्यांनी सांगितले आहे की, पंढरपूर आनंदाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे. आज त्यात सेवेचा आनंदही मिसळला आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत आहे. याचा मला आनंद होत आहे. पंढरपुराकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वारीत ना जातपात, ना भेदाभेद

पंढरीची वारी हे सामाजिक समरसतेचे प्रतीक असल्याचे सांगून मोदी म्हणाले, भेदाभेद अमंगळ ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. वारीमध्ये महिला-पुरुष, श्रीमंत-गरीब, उच्च-नीच असा कोणताही भेद नसतो. वारकरी परस्परांना माऊली या नावाने संबोधतात. एकमेकांच्या पाया पडतात. त्याद्वारे ते मातृशक्तीचाही सन्मान करीत असतात. पंढरपूरची भक्ती, अभिव्यक्ती सर्व काही अलौकीक आहे.

ही युग संतांची भूमी

मोदी म्हणाले, आपण म्हणतो ‘माझे माहेर पंढरी आहे. भिवरीच्या तिरी’. माझे पहिले नाते गुजरातच्या द्वारकाशी आहे. दुसरे काशीशी आहे आणि पंढरपूर ही माझ्यासाठी दुसरी काशी आहे. या भूमीत देवाचा वास आहे. सृष्टीची निर्मिती झाली नव्हती; तेव्हापासून पंढरपूर अस्तित्वात असल्याचे संत नामदेवांनीही सांगितले आहे. या भूमीने अनेक संत दिले आहेत. युग संत निर्माण केले. भारताला नवे चैतन्य आणि ऊर्जा दिली.

वारीमुळे भारतीयत्वाची भावना बळकट

देशावर अनेक आक्रमणे झाली. अनेक शतकांची गुलामगिरी सहन करावी लागली, अनन्वित अत्याचार सहन करावे लागले. या सर्व संकटांचा सामना करून पंढरीची वारी अविरतपणे सुरू आहे. जगातील सर्वांत प्राचीन अशी जनयात्रा म्हणजे पंढरीची वारी आहे. वारी म्हणजे भारताच्या शाश्वत भावनेचे प्रतिक आहे. आपल्या आस्था वेगवेगळ्या असतील, मार्ग वेगळे असतील, पद्धती आणि विचारही वेगवेगळे असतील. मात्र, प्रत्येकाचे ध्येय हे एकच आहे ते म्हणजे भागवत धर्म. त्यामुळे भारतीयत्वाच्या भावनेला बळकटी देण्याचे काम पंढरीची वारी करते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भाषणाची सुरवात अन् शेवटही मराठीतच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम कृष्णहरी… राम कृष्णहरी … मराठीतच भाषणाची सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकली. भाषणाचा समारोपही जय जय रामकृष्ण हरी… असे म्हणत केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयसिध्देश्वर महास्वामी, आ. समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक, आ. सुभाष देशमुख, आ. बबन शिंदे, आ. राम सातपुते, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदीसह भाजप आमदार उपस्थित होते.

तीन गोष्टींचा आशीर्वाद मागतो…

मोदींनी आपल्या भाषणात श्री विठ्ठलासह उपस्थितांकडे तीन गोष्टींचा आशीर्वाद मागितला. ते म्हणाले, दोन्ही पालखी मार्गाचे काम होत असताना दुतर्फा डेरेदार वृक्ष लावा. मार्गालगतच्या गावकर्‍यांनी ही जबाबदारी घ्यावी. दुसरा आशीर्वाद म्हणजे या रस्त्यांच्याकडेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचे स्रोत तयार करा. 21 दिवस वारकरी वारीला येतात. त्यांच्यासाठी पिण्याचे शुद्ध पाणी जागोजागी असायला हवे. तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि सुंदर तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा विकास करा. भारतातील सर्वांत स्वच्छ आणि सुंदर तीर्थस्थळ म्हणून पंढरपूरचा लौकिक वाढवावा.

Back to top button