कोडोलीच्या गिर्यारोहकाचा नाशिक येथे हृदयविकाराने मृत्यू | पुढारी

कोडोलीच्या गिर्यारोहकाचा नाशिक येथे हृदयविकाराने मृत्यू

कोडोली, पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील पर्वतगडावर चढाई करत असताना कोडोली येथील शिवदुर्ग ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य राजेंद्र रामभाऊ बिचकर (वय 58) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक परिसरातील पाच दिवसांत आठ गडांची मोहीम सर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुणे व मुंबई येथील 60 गिर्यारोहक नाशिकला गेले होते. त्यामध्ये कोडोली येथून राजेंद्र बिचकर व अजित गुरव हे दोघे शनिवारी नाशिकला गेले होते. शनिवारी पहाटे पाच वाजता नाशिक येथील पेनगिरीगडावर चढाई करून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ही मोहीम सकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण केली. त्यानंतर 11 वाजता पर्वतगड चढण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी गडाच्या पायथ्यालाच बिचकर यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अजित गुरव यांनी नाशिक येथून रविवारी पहाटे बिचकर यांचा मृतदेह कोडोली येथे आणला. सकाळी आठ वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिचकर यांनी कोडोली शिवदुर्ग ट्रेकिंग ग्रुपची स्थापना करून कोडोलीतील अनेक तरुणांना सोबत घेऊन अनेक गडकोट मोहिमा यशस्वी केल्या होत्या. त्यांनी सुमारे 320 गड, किल्ले, पर्वत यशस्वीपणे सर केले होते. सध्या ते रंगकाम ठेकेदार म्हणून व्यवसाय करीत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे कोडोलीतून हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button