दूध भेसळ : कोल्हापूर जिल्ह्यात 28 ठिकाणी छापे; 14 नमुने तपासणीला पाठवले | पुढारी

दूध भेसळ : कोल्हापूर जिल्ह्यात 28 ठिकाणी छापे; 14 नमुने तपासणीला पाठवले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात दूध भेसळीच्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने दूध तपासणीची मोहीम दुग्ध विभाग व अन्न आणि औषध प्रशासन यांच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात पाच दिवस 28 ठिकाणी छापे टाकले. त्यात सुमारे 3 हजार लिटर दूध तपासण्यात आले. यातील एकाही ठिकाणी दुधात भेसळ सापडलेली नसल्याचे समजते. तरीही 14 ठिकाणाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

एकीकडे राज्यात दुधाची मागणी वाढत आहे; तर दुसर्‍या बाजूला भेसळीचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. शासनाने दूध तपासणीसाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. दूध तपासणीसाठी अधिकार्‍यांचे पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने गोकुळ दूध संघ, शाहू मिल्क संघ. तसेच प्राथमिक दूध संस्था, दूध पॅकिंग सेंटरची तपासणी केली. कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादकांकडून चांगल्या प्रतीचे दूध आणले जात आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

कुठे कुठे तपासले

गोकुळचे बल्क कुलर चुये, कावणे, गडहिंग्लजसह गोकुळकडे जमा होणार्‍या दुधापैकी 11 ठिकाणी तपासणी करण्यात आली. तसेच कॅनमधून दूध वाहतूक करणारी वाहने तपासली. शाहू मिल्कचे व्हन्नूर, टँकरमधील गाय व म्हैस दूध, गाय दूध पँकिंग 500 मि.लि. तपासण्यात आले. यामध्ये कोठेही दोषी दूध आढळलेले नाही, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Back to top button