अग्रीम आयकर कमी भरणार्‍या पाच लाख करदात्यांना नोटिसा! | पुढारी

अग्रीम आयकर कमी भरणार्‍या पाच लाख करदात्यांना नोटिसा!

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : उत्पन्न मिळूनही अग्रीम आयकराचा (अ‍ॅडव्हान्स इन्कमटॅक्स) भरणा न केलेल्या अथवा कमी केलेल्या देशातील सुमारे पाच लाख करदात्यांना आयकर विभागाने नोटिसा काढल्या आहेत. या करदात्यांच्या व्यवहाराची तपासणी केल्यानंतर आयकर खात्याने बजावलेल्या या नोटिसांमुळे करदात्यांत खळबळ माजली आहे. आयकर खात्याची ही मोहीम करदात्यांसाठी अग्रीम कराचा दुसरा हप्ता भरण्यापूर्वीची सूचक घंटा आहे. या हप्त्यामध्ये कराचा यथायोग्य भरणा झाला नाही, तर करदात्यांना चौकशीला सामोरे जावे लागू शकते.

देशात आयकर खात्याने करदात्यांभोवती जाळे गेल्या काही वर्षांत अधिक घट्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये आता प्रत्येक तिमाहीला करदाते त्यांच्या व्यवहाराच्या प्रमाणात किती कर भरतात, यावरही आयकर खात्याची करडी नजर आहे. यासाठी करदात्यांच्या संबंधित तिमाहीतील व्यवहार मोठ्या रकमेची खरेदी यांचा डाटाही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असल्याने त्याची छाननी करण्यात येते. अशा नमुना चाचणीला 2019-20 या आर्थिक वर्षात सुरुवात झाली होती. तेव्हा 5 लाख करदात्यांच्या अग्रीम कर भरण्याचा आढावा घेण्यात आला होता. 2020-21 आणि 2021-22 मध्ये अनुक्रमे 10 लाख आणि 17 लाख करदाते स्कॅनरखाली होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये या खात्याने सुमारे 25 लाख करदात्यांच्या व्यवहारांची छाननी केली आहे.

Back to top button