कोल्हापूर : जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांना दोन लाखांचा मोफत अपघाती विमा | पुढारी

कोल्हापूर : जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांना दोन लाखांचा मोफत अपघाती विमा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्थांच्या 18 ते 85 वर्षांपर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डधारक कर्जदार सभासद शेतकर्‍यांना अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये भरपाई करणारा व्यक्तिगत अपघाती विमा उतरवला आहे. विमा हप्त्याची एक कोटी 19 लाखांची रक्कम जिल्हा बँकेने भरली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

अपंगत्व आल्यासही शेतकर्‍याला या योजनेमधून भरपाई मिळणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना कोणतीही तोशीस लागणार नाही. लवकरच निविदा मागवून जिल्हा बँकेकडे पगाराची खाती असलेल्या नोकरदारांसाठी 30 लाख रुपयांच्या सामूहिक अपघाती विमा सुरक्षेची योजना राबविण्याचा निर्णयही बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झाला. रस्ते अपघातसह, सर्पदंश, पाण्यात बुडून, विजेच्या धक्क्याने अथवा वीज पडून झालेला मृत्यू, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तसेच शेतीकामे करताना झालेले अपघात आदी बाबींचा यात समावेश आहे.

अपघाती मृत्युमुळे शेतकर्‍याचे कुटुंब उघड्यावर पडू नये, म्हणून बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी संचालक आ. सतेज पाटील, रणवीरसिंह गायकवाड, विजयसिंह माने, सुधीर देसाई, रणजीतसिंह पाटील, श्रुतिका काटकर आदी उपस्थित होते.

अशी आहे अपघात विमासुरक्षा योजना…

दोन लाख 85 हजार 880 शेतकर्‍यांना विमा सुरक्षाकवच
अपघाती मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई
कायम व अंशतः अपंगत्व आल्यास मिळणार भरपाई
शेतकर्‍यांना तोशीस लागू न देता बँकेनेच उचलला आहे विमा हप्त्याचा भार

Back to top button