करुळ घाटात दरडी कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत | पुढारी

करुळ घाटात दरडी कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत

गगनबावडा, पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून गगनबावडा तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसाने तालुक्यातील कुंभी, धामणी, सरस्वती या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कुंभी नदीचे पाणी मांडुकली व खोकुर्लेनजीक रस्त्यावर येऊन काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाचा जोर आजही कायम राहिल्याने करुळ घाटात दरडीचा एक भला मोठा दगड रस्त्यावर आला. राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा दगड जेसीबीच्या सहाय्याने दूर करून घाटरस्ता वाहतुकीस सुरळीत केला. दरम्यान, आ. नितेश राणे यांनी करुळ घाटमार्गाची पाहणी करून घाटाच्या दुरवस्थेमुळे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले.

घाटमार्गातील रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरावेत, गटारी काढाव्यात, तुटलेल्या संरक्षक कठड्याबाबत योग्य नियोजन करून हा मार्ग वाहतुकीस सुरक्षित करावा, अशा सूचना दिल्या. यावेळी महामार्ग विभागाचे अभियंता अतुल शिवणीकर यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी हजर होते. गगनबावडा तालुक्यात पडत असलेल्या या धुवाँधार पावसाने तालुक्यातील वेसरफ, कोदे, अणदूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Back to top button