कोल्‍हापूर : शिरोळ तालुक्‍यातील 3 बंधारे पाण्याखाली | पुढारी

कोल्‍हापूर : शिरोळ तालुक्‍यातील 3 बंधारे पाण्याखाली

  • कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने कृष्णा, पंचगंगा नदीवरील शिरोळ तालुक्यातील तेरवाड, शिरोळ आणि राजापूर हे तिन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिरावली आहे. तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतल्याने 6 इंचाने पाणी-पतळी कमी झाली आहे.पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्याची जलपर्णी वाहती होऊन शिरढोण पुलाजवळ येऊन तुंबली आहे. लगतच्या शेतीत जलपर्णी विसावली आहे. या जलपर्णीचे प्रत्येक वर्षीचे संकट टळणार कधी अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.

    चार दिवसांपूर्वी पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने शनिवारी पहाटे तेरवाड व शिरोळ हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर गेल्या दोन दिवसापासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी राजापूर बंधाराही पाण्याखाली गेला आहे.

    कृष्णा नदीचे आयुर्विन पुलाखालून 1800 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर वारणा नदीतून 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकूण अंकली पुलाखालून 2300 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यातून पाणलोट क्षेत्र आणि राधानगरी धरणातून सोडण्यात आलेल्या एकत्रित 12 हजार 36 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटक राज्यात 18 हजार 150 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फूट 9 इंच आहे तर पंचगंगा नदीची पाणीपातळी 19 फूट 10 इंच आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतल्याने 6 इंचाने पाणी पातळी घटली आहे.

    पंचगंगा नदीला प्रत्येक वर्षी जलपर्णीचा विळखा पडतो. यावेळीही हा विळखा जटील झाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. जलपर्णी वाहती होईल अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. मात्र तेरवाड बंधाऱ्यापर्यंत येऊन थांबलेली जलपर्णी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ती वाहती होऊन शिरढोण पुलाजवळ येऊन तुंबली आहे. पाणी-पातळीत वाढ झाल्याने पाणी नदीपात्राबाहेर आले आहे.लगतच्या शेतीत ही जलपर्णी विसावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

    पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपंपाच्या मोटारी काढून घेतल्या आहेत. मोटारीच्या स्टार्टर पेट्याही पाण्यात बुडाल्या आहेत. अशातच पावसाने उसंत घेतल्याने शेतीला पाणी पाजणे अडचणीचे झाल्याने शेतकरी हवाल-दिल झाले आहेत.

    हेही वाचा 

  • Aadhaar-PAN link : आधार-पॅन लिंक केलं नाही, जाणून घ्या काय नुकसान होऊ शकते
  • कराड : डॉक्टरच्या घरात शस्त्राच्या धाकाने जबरी चोरी; १० तोळ्‍याच्या दागिन्यांसह १२ लाख रूपये लंपास
  • कोल्हापूर जिल्ह्यात दुसरे मंत्रिपद मिळणार का ? आ. कोरे, आवाडे, आबिटकर चर्चेत

Back to top button