सर्जा-राजाच्या उत्सवात गडहिंग्लज शहर दुमदुमले; पाटील, डोमणे, नाईक यांच्या बैलजोड्या अव्वल | | पुढारी

सर्जा-राजाच्या उत्सवात गडहिंग्लज शहर दुमदुमले; पाटील, डोमणे, नाईक यांच्या बैलजोड्या अव्वल |

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : गडहिंग्लज येथील छ. शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे आयोजित सुदृढ बैलजोडी स्पर्धेत बैलजोडी गटात सुनील पाटील (निलजी), बिनदाती गटात मोहित डोमणे (गडहिंग्लज), दोन दाती गटात अमित पाटील (गडहिंग्लज) तर चार ते सहा दाती गटात बाळेश नाईक (बसर्गे) यांच्या बैलजोड्यांनी अव्वल क्रमांक पटकाविले. महाराष्ट्रीय बेंदरानिमित्त छ. शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे स्पर्धा झाली. यंदाचे त्यांचे हे २१ वे वर्ष होते.

स्पर्धेत तालुक्याच्या विविध भागातून ३० हून अधिक बैलजोड्यांनी सहभाग नोंदविला. दिवसभरात प्रत्येक बैलजोड्यांची गडहिंग्लज शहरातील मुख्य रस्ता, बाजारपेठेतून मिरवणूक काढून वाजत-गाजत थाटात स्पर्धेच्या ठिकाणी आणण्यात आले. पशुपालकांनी कुटुंबीयांसमवेत लाडक्या सर्जा-राजासह सहभाग नोंदविला. त्यांचे समर्थक बेधुंद होऊन नाचत होते. पी ढबाकऽऽसह हलगीच्या निनादात शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली.

बैलांच्या शारीरिक धडधाकटेबरोबरच त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची तसेच देखणेपणाची पारख करण्यात आली. परीक्षणानंतर रात्री आठ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. उर्वरित निकाल (द्वितीय ते चतुर्थ क्रमांक) : बिनदाती गट : जमीर नदाफ (गडहिंग्लज), महेश कोदळी (गडहिंग्लज), काळाप्पा देसाई (इदरगुच्ची). दोन दाती गट : साईनाथ व वैभव पाटील (गडहिंग्लज), अशोक खवणे (नूल), भीमसेन विटेकरी, रामगोंडा पाटील (विभागून). चार ते सहा दाती गट : अमोल पाटील (गडहिंग्लज), अभिजित मोळदी (गडहिंग्लज), शशिकांत कोड्ड (गडहिंग्लज). बैलजोडी गट : शिवराज शिंदे (गडहिंग्लज), काशिनाथ बेळगुद्री (गडहिंग्लज), महेश रेडेकर (गडहिंग्लज) असा आहे.
अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, पोलिस अधीक्षक सुरेश मेंगडे, राजन तेली, शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, रियाज शमनजी, संतोष चिकोडे व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. प्रत्येक गटातील चार विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे रु. २० हजार, १५ हजार, १० हजार व ५ हजारांचे रोख पारितोषिक व ढाल देण्यात आली. विविध मान्यवरांचा मंडळाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भैसकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, सचिव शिवाजी रेडेकर, खजिनदार प्रकाश तेलवेकर व सभासदांनी नेटके नियोजन केले. स्पर्धा पाहण्यासाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगडसह सीमाभागातील शेतकर्‍यांनी गर्दी केली होती.

Back to top button