‘कोणी सावली देता का सावली?’: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील झाडे तोडली | पुढारी

‘कोणी सावली देता का सावली?': कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील झाडे तोडली

सुभाष पाटील : विशाळगड

: कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी मोठ-मोठ्या विविधांगी झाडांची तोड करण्यात आली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या चटक्यांमुळे प्रवास त्रासदायक वाटू लागला आहे. महामार्गावर दुचाकींसोबत चारचाकी वाहने सावलीत उभी करण्यासाठी वाहन चालकांना ठिकठिकाणी धडपड करावी लागत आहे. ‘कोणी सावली देता का सावली?, अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांसह प्रवाशांवर आली आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग वाहतुकीच्या व प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. या महामार्गावर पर्यटनस्थळे, औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे महामार्गावर सतत वाहतूक असते. या महामार्गाच्या दुतर्फा अनेक वर्षे तग धरून राहिलेली लहान-मोठे झाडे मोठ्या प्रमाणात होती. सातत्याने होणारे अपघात, नागमोड्या वळणांचा महामार्ग वाहन चालकांसाठी धोकादायक बनला होता. त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण, कमी अंतर व थेट महामार्ग करण्याच्या दृष्टीने चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या वृक्षराजी आणि झाडांमुळे निर्माण झालेल्या सावलीतून प्रवास करणे आल्हाददायक ठरत होते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना रस्त्यानजीक असलेली आणि चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे तोडण्यात आली.

पर्यटनासाठी येणाऱ्या प्रवाशांना क्षणभर विश्रांतीसाठी वृक्षवल्ली उपयुक्त ठरत होती. शिवाय पशु-पक्ष्यांना खाद्य, निवारा देखील मिळत होता. मात्र सध्या महामार्गावर सावली हरविल्याने नेहमी प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी, व पादचारी यांची गैरसोय झाली आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून एसटीची व गाडीची  वाट पाहत असताना झाडांच्या सावलीचा आसरा मिळत होता. तो आता दुर्मिळ झाला आहे. तोडलेल्या या झाडांच्या ठिकाणी सावली देणारी नवी झाडे लावण्यासाठी काही वर्षाचा कालावधी लागणार असल्याने त्याचा फटका महामार्गाने प्रवास करणाऱ्‍या वाहनचालकांसह प्रवाशांना बसणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये हवेतील उष्मा कमालीचा वाढला असून रखरखत्या उन्हातून प्रवास करणे नकोसे होत आहे. अशा स्थितीमध्ये दुतर्फा झाडी नसलेल्या महामार्गाने दुपारच्यावेळी प्रवास करणे वाहनचालक आणि प्रवाशांना अडचणीचे ठरत आहेत. उन्हाने तापून जीव कासावीस झाल्यास झाड नसल्याने सावलीमध्ये उभे राहणेही दुरापास्त झालेले आहे.

हेही वाचा 

Back to top button